Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५०


मनू

काल संध्याकाळी नेहेमीप्रमाणे वॉक घ्यायला बाहेर पडलो. जरा वेगळ्या वाटेने जाऊया म्हणून नदीकाठचा रस्ता पकडला. तू बरोबर असताना नेहेमी तिथली झाडं दाखवायचीस मला - कडुनिंब, अशोक, आंबा, शिरीषकॅशिया, चाफा. प्रत्येक झाडाशी तुझं एक नातं जुळलेलं असायचं. झाडं आपल्याशी बोलतात म्हणायचीस. मग काल मी पण जरा बोलायचं प्रयत्न केला त्यांच्याशी. तुझ्या सगळ्या आठवणी सांगितल्या त्यांना

कडुनिंबाला मी तुझ्या तक्रारी सांगितल्या, अशोकाला तुझं अति विचार करणं, आंब्याला तुझा आनंद, शिरीषला तुझे बारीक सारीक रुसवे-फुगवे, कॅशियाला तुझं तंद्री लागणं आणि चाफ्याला आपल्यातली मैत्री. मग त्यांनीही आपापलं मन मोकळं केलंमला एक जाणवलं मनू, झाडं नुसतीच बोलत नाहीत आपल्याशी, ती खूप उभारी देतात आपल्या मनाला. मला असं वाटलंच नाही, की तू नाहीस इथे इतकी ही झाडं बोलली माझ्याशी. कुठून हे सगळं शिकतेस आणि जमवतेस तू ?? 

अरे हो, महत्वाचं राहिलंच, बुचाच्या झाडाशी पण बोललो बरं का मी. ते कसं विसरून चालेल? आता काय बोललो असेन ते तुला माहितीच आहे

तूच म्हणतेस ना, सगळीच नाती शब्दात बांधता येत नाहीत, त्यांचे आयाम आणि मर्यादा समजल्या की आयुष्य सुंदर होऊन जातं. झाडांशी बोलताना आज हे नव्याने जाणवलं.

आपलं नातं सुद्धा जसं असायला हवं तसंच आहे, नाही ?तसूभर कमी नाही आणि पसाभर जास्त नाही

मागे वळून बघताना जाणवतंय मनू, बुचाच्या झाडाला बहर आल्यावर ते वाकत नाही तर देण्यासाठी हात पुढे करतं. आपल्या ओंजळीत आपण खूप फुले वेचू शकलो; हे आपलं भाग्य

तर वेडाबाई, तुझ्या डोळ्यातून एक चुकार अश्रू बाहेर पडू पाहतोय, तो तिथेच असू देत.मी येतोय टिपायला.
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया...या ओळी आज जागवणार मला.

(बुचाच्या फुलांमध्ये तुला पाहणारा)मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: