Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३३

रे

काही गोष्टींशी जुळलेली नाळ कधीच तोडता येत नाही....कुठेकुठे जुळून राहिलेली असते ही नाळ...


परसातल्या कडूनिंबाशी...


अंगणातल्या तुळशी वृंदावनाशी....


भिंतीवरच्या आजोबांच्या तसबिरीशी...


कौलाच्या फटीतून दिसणाऱ्या आभाळाच्या तुकड्याशी.....

नदीवरच्या देवळातून येणाऱ्या घंटारवाशी...

गच्चीतल्या चांदण-गारव्याशी...


बुचाच्या झाडाशी..


तुझ्याशी.....


स्वतःशी....

नाही तुटत नाळ....का असं? कधी विचार केलायस??

कारण तिचं खरं नातं बिजाशी नसतंच. बीज फक्त मूर्त रूप नाळेच्या उगमाचं, तिचं खरं नातं असतं ते त्या बीजातल्या सत्वाशी....त्याच्या अमूर्त रुपाशी. ते सत्व तिला तिचं अस्तित्व विसरू देत नाही. 

आपल्या सगळ्या गुण-दोषांचा परिपोष या सत्वातून बीजात- बीजातून नाळेत- नाळेतून आपल्या धमन्यांमध्ये प्रवाहित झालेला असतो. इतका मिसळून गेलेला असतो की ती नाळ आणि सत्व हे वेगळे उरतच नाहीत. 

माणसं तुटतात, जागा सुटतात, काळाचा प्रवाह बदलतो.....काल असते ते आज नसते आणि आज जे आहे ते उद्या नसेल हे चक्र अव्याहतपणे चालू राहते. पण ही काल-आज-उद्या मध्ये वावरणारी अदृश्य नाळ नाही तुटत....ती तोडायचं धाडस तरी कुठून गोळा करायचं? 

तुझं माझं असंच आहे....पुन्हा भेटू न भेटू माहिती नाही पण बुचाच्या फुलांमधून वाहणारी ही नाळ नाही तोडता येणार कधी......नाही तुटणार... ती तशीच राहील !!!

(तुझ्या-माझ्यातल्या नाळेची विश्वस्त) मी
पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: