Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १५



रे 

आभाळ गच्च भरून येतंय रोज संध्याकाळी ... पण पाऊस काही पडत नाहीये. काळ्या ढगांना रोज विचारते मी, एवढं काय साठवून ठेवताय बाबांनो , कोसळा आता एकदाचे ! पण मोकळं होणं आणि वाहून जाणं यात फरक असतो. ढग मोकळे होण्याची वाट पाहातही असतील पण वारा त्यांना वाहून नेतोय त्याला ते काय करतील बिचारे ? आणि जेव्हा मोकळे होतील तेव्हा सोबतीला वादळ आणतील. पण यायला हवा पाऊस, नुसता नाही, कोसळलायलाच हवाय .... आभाळ पुन्हा गच्च भरणार कसं त्याशिवाय ???

असं कधी होतं का रे तुझंही ... की खूप काही साठलेलं असतं मनात ;पण सांगायला जावं नं तर काहीच सुचत नाही. माझं  होतं असं  बरेचदा.  मनाचं आभाळ हे विचारांचे काळे ढग व्यापून टाकतात. पण धड पाऊस पडत नाही आणि धड मळभ जात नाही अशी अवस्था होतेसमोरचा विचारून विचारून थकतो; बाई गं  काय झालंय तुला पण मी शून्यात हरवल्यासारखी सांगते "काहीच नाही ".

ही जी अवस्था असते "काहीच नाही" वाली ,  ती फार फार वेळ जीव कुरतडत राहतेम्हणजे भडाभडा समोरच्याला सगळं सांगून मोकळ व्हावं तर सभ्यतेच्या मर्यादा आड येतात, शिवाय समोरच्याच्या मनात आपली प्रतिमा असते तिला धक्का वगैरे लागू नये असं वाटत. काही संदर्भ गाळून सांगावं म्हणलं तर जे सांगायचंय त्याची तीव्रता पोचेल याची खात्री देता येत नाही. मूग गिळून गप्प बसावं तर आतल्या आत विचारांचा चिखल होतो अगदी

अशा वेळी मी स्वतः स्वतःला शरण जाते आणि सरळ लिहायला बसते

"लिहिणं" सुद्धा एक प्रकारे मेडिटेशनच आहे रे. जी शून्यावस्था मन उद्विग्न करून जाते तीच शून्यावस्था लिहिताना गाठली कि मन एका निरंकार अवस्थेला पोचतं. सोप्प्या शब्दात "तंद्री लागते".. ..आजूबाजूचं भान विसरायला होत, आत आत डोकावून बघायला लागतो आपण

एकेक शब्द कागदावर उतरवताना मनाचा एकेक खिसा रिकामा होत जातोय असं वाटत राहत. शब्द बोलावतात , हाक मारतात , लपंडाव सुद्धा खेळतात पण शेवटी समोर उभेही ठाकतात... ये आणि भीड आम्हाला म्हणून. एका विचारावर जास्त रेंगाळता दुसरा , तिसरा, चौथा विचार कागदावर आपसूक उमटत जातोदुसऱ्या कोणाशी बोलताना जे अनामिक दडपण असत ते पार पळून जातं.

एकूणच स्वतः स्वतःशी बोलण्याचा, संवाद साधण्याचे हे क्षण मला फार आवडतात. ना कुणाची बांधिलकी, ना कुणाचा आधार , ना कुठले राग, लोभ, मत्सर, मोह !!  सगळ्याच्या पलीकडे गेल्यासारखं तरीही सगळ्यात भरून राहिल्यासारखं वाटू लागतं

"काहीच नाही" मधेच "बरंच काही" घडून जातं अशा रीतीने. विचारांचे ढग कागदावर पाऊस होऊन अवतरतात आणि मनाचं आभाळ परत एकदा स्वच्छ, निरभ्र होऊन जातं !! 

आजही असाच एक पाऊस पडून गेलाय रे .... पण तू नाहीस इथे. मी आणि आपलं बुचाचं झाड वाट पाहतोय तुझी. ये लवकर.... खराखुरा पाऊस घेऊन ! येशील नं ?.... 

- ( हे वाचताना तुझ्या डोळ्यातला पाऊस दिसणारी ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज

लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: