Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३९



रे

मनाचे गुंते जटिल असतात फार. सोडवायला जाऊ म्हणलं की सोडवता येतीलच, अशा वेळा क्वचितच. कुणी खिजवतं, कुणी टाळत, कुणी हेटाळतं, कुणी रडवतं, कुणी फसवत, कुणी कडेलोट करतं.......

सगळं निमूट सोसून झाल्यावर मनाचा मनाशीच झगडा सुरु होतो.  का नाही कळलं आपल्याला, का विश्वास ठेवला आपण, पहिल्यांदा शंका आली तेव्हाच का नाही थंबलो आपण?? ज्याने फसवलं, रडवलं, चिडवलं, टाळलं, कडेलोट केला, त्याला याचा थांगपत्ता नाही आणि इथे मनावरचे ओरखडे जखमांमध्ये बदलले, म्हणजे गुंता सुटायचं नावच नाही.

एक गाठ ऊकलताना दुसरी गाठ अजून घट्ट बसतेय.... सुरगाठीच्या निरगाठी होतायत. मग मन दारं घट्ट बंद करून घेतं. आता अजून कोणाला आत येऊ देऊ नकोस. आहेत ते गुंते सुटुदेत आधी, जरा विसावा घे, कडवटपणा जाऊ दे, मग दार उघड. पण सावध राहा....पुढची गाठ बसण्याआधीच माघार घे. सावर स्वतःला. ओरखडा उठेपर्यंत वेळच आणू नकोस. तिथेच तोडून टाक किंवा पूर्ण दुर्लक्ष कर.

तोडून टाकायचं म्हणजे परत मागे वळून बघायचं नाही, झालं गेलं ते केरात, पुढे बघत चालायचं. दुर्लक्ष करायचं म्हणजे जे काय चाललंय आणि जे होईल ते चांगल्यासाठीच ....चांगलं ते घ्या आणि न पटेल ते सोडून द्या म्हणत पुढे चालत राहायचं. आणि यातलं काहीच जमत नसेल तर मनाचे गुंते आणखी वाढवा! दुसरं काय ??? शेवटी मग कोणालाही मनात डोकावून घ्यायचंच नाही मुळी आता, असा निर्धार केला जातो. 

पण.....

नेमकं तेव्हाच एका अनोळखी क्षणी बेसावध असताना एखादा जुना ऋणानुबंध नव्याने सामोरा येतो. काळाचे, वयाचे पडदे बाजूला सारून मनावर हळुवार फुंकर घालतो. मनाच्या गाठी सुटत नाहीत पण त्या कुणालातरी समजतायत , उमजतायत.....तितक्याच तीव्रतेने आणि खोलवर; याने गाठी सैलावतात तरी. 

एखाद्या वेळेपुरता तो साक्षात्कार असतो फक्त, स्वतःची स्वतःला नव्याने ओळख पटण्याचा. कधी आधार असतो - एक गाठ सोडवायला दोन्ही टोकं अलगद हातात यायला मदत करणारा. ज्या कारणासाठी तोडायचा किंवा दुर्लक्ष करायचा निर्धार केला होता, त्याच कारणाकडे स्वछ , नितळपणे पाहायची दृष्टी मिळून जाते नकळत . 

अशा अलवार ऋणानुबंधाला काही 'नाव' द्यायच्या भानगडीत पडू नये किंवा त्याला कुठल्या 'नात्यात' बसवायचा अतिशहाणपणाही करू नये. त्याने सुटत आलेला गुंता अजून वाढायची शक्यता जास्त असते. काही बंध कुठल्याही नावाच्या वा नात्याच्या पलीकडे जाऊन सतत काहीतरी 'देण्या'साठीच येतात आयुष्यात. त्यांना समर्पित होण्याशिवाय हातात काही उरत नाही म्हणून जोवर आहेत तोवर जपावेत असे ऋणानुबंध !

शेवटी कुणीच कुणाला जन्मभर पुरणार नसतंच, एकला चालो रे तर असतंच. हो न?

पण एक सांगू? 

तू येऊन गेल्यानंतर वाऱ्याची प्रत्येक झुळूक मला हा विश्वास देते की बुचाची फुलं आणि मी शेवटपर्यंत असू एकत्र. कुठल्या जन्मीचा ऋणानुबंध आहे आमचा कोण जाणे! तुला माहितीय???

(मनाच्या न सुटलेल्या गुंत्यांसोबत) मी



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: