Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३७


रे  

तू शेणाने जमीन सारवायचा अनुभव घेतलायस कधी ? मी घेतलाय . 

शहरात राहून आपल्या काही कल्पना अगदी दृढ झालेल्या असतात. गोठ्याजवळून जाताना आपण नाक दाबून पुढे जातो. शेण म्हणजे काहीतरी घाण असंच डोक्यात बसलेलं असतं. 

माझी एक मैत्रीण गावाकडून शहरात शिकायला म्हणून आली होती. २-३ महिन्यातून एकदा तिची चक्कर व्हायची गावाकडे. तिथे त्यांची भरपूर शेती, मळे आणि मोठ्ठा वाडा होता. एकदा ती मला आग्रहाने घेऊन गेली तिच्या गावी. वाड्यासमोर प्रशस्त कट्टा आणि त्याला लागून मोठ्ठ अंगण. आम्ही कट्ट्यावर सागर गोटे खेळत बसलो होतो. दुपारचा चहा झाला आणि तिची आजी शेणाची पाटी घेऊन आली. बरोबर घरातल्या कामकरी बायकाही होत्या. सगळ्यांनी मिळून ते भलं मोठं अंगण सारवायला घेतलं. आजीने मलाही ये म्हणून खुणावलं. मी शहरी संकोचाने आणि "ई .... त्यात काय हात घालायचा ?' म्हणून तशीच ढिम्म बसून होते. पण त्या बायकांना सारवताना पाहून माझी मैत्रीण मला म्हणाली , तुला वाटत तितकं वाईट नसतं शेण ; उलट किडे कीटक यापासून संरक्षणच मिळतं जमीन सारवली की. चल बघू , असं म्हणत तिने जवळ जवळ ओढून नेलं मला. बाकीच्या बायका तोंडावर पदर धरून फिदीफिदी हसायला लागल्या. आजीने दटावलं त्यांना आणि माझ्याकडे वळून म्हणाली , "पोरी बग तरी सारवून एकदा, नुसती जमीनच नाय, अक्षी मन भी साफ होतंय बग". 

त्यानंतर मी कशी बशी का होईना पण त्या जमीन सारवण्यात सहभागी झाले. अर्धा पाऊण तास कसा गेला कळलं नाही. शेणाच्या पाटीत हात घालून , ते कालवून जमिनीला लावताना, त्याचं एकसारखं लिंपण करतांना, २ थर चढवताना, एकसारखं करायला हात फिरवताना मनाची तंद्री लागली होती. जमीन सारवून झाली आणि हात धुवायला म्हणून नळावर गेलो तेव्हा हात धुता धुता कसं काय कोण जाणे; पण मनातून एकदम खूप छान, स्वच्छ, नितळ वाटायला लागलं. 

त्या वेळी आजी काय म्हणाल्या होत्या ते कळलं नव्हत नीटसं पण आज लक्षात येतंय. 

मनाचंही असच असतं ना रे ! अनेक बरे वाईट अनुभव आल्यानंतर ते कोरडं व्हायला लागल , खडबडीत होतं , मळत... असं झालं की ते सारवायला घ्यायचं. छानपैकी एरवी आपण सहजी न करणाऱ्यातली एखादी गोष्ट करायची - मोठ्याने भसाड्या आवाजात गाणं म्हणून पाहायचं, मोट्ठ्या आवाजात गाणी लावून एकटंच मनसोक्त नाचायचं, फारशी माहिती नसलेल्या एखाद्या भागात मस्त भटकून यायचं , टेकडी चढून जाऊन तिथून जोरदार ओरडायचं, खूप वर्ष बाजूला ठेवलेले भरतकामाचे नमुने पूर्ण करून टाकायचे ...... असं  काहीही !! अशी एखादी गोष्ट केली ना , की जगायला आणि आनंदी राहायला आपल्याला खूप दूर जावं लागत नाही, आनंद आपल्यातच लपलेला असतो ; हे जाणवतं. आणि आजी म्हणतात तस मनाची जमीन सारवली जाते छान ; परत एकसारखी होते , कोरड्या झालेल्या मनाला ओलावा मिळून जातो आणि साचलेल्या मळकट विचारांमधून ते आपोपाप मोकळं होऊन जातं. 

आता तू म्हणशील ; आज काय एकदम फिलॉसॉफिकल झालीस !

तर .... आज परत एकदा शेणाने जमीन सारवावीशी वाटतेय मला. ते शक्य नाही म्हणून मी अंगणातल्या सगळ्या कुंड्याना गेरू लावायला घेतलाय. त्यातली एक कुंडी तू दिलेल्या मोगऱ्याची आहे. ती गेरूने सारवताना एकीकडे बुचाच्या झाडाशी गप्पा मारेन मी. त्याला दुखलं तर ते कुणाजवळ सांगेल बिचारं ?? तू तरी कुठे सांगतोस ???

म्हणून हे सारवण्याचं पुराण !

 (सारवण्याच्या या प्रपंचात तुला सावरणारी ) मी  

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: