Search This Blog

Tuesday, November 20, 2018

लघुकथा ८- सुखिया झाला


पसायदानावरचं निरूपण संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. सुमन कमरेतून थोडी झुकती झाली. जमलेल्या रसिकांच्या कौतुकाने भारावून जात त्यांना नम्रपणे अभिवादन करून ती स्टेज वरून हळू हळू खाली उतरायला लागली. तिने अलगद डोळ्यांच्या कडातलं पाणी टिपलं आणि चष्मा सरळ केला. तिला समोरून दोन्ही नातसुना तिच्या दिशेने चालत येताना दिसल्या. एकीकडे ती रसिकांशी अनौपचारिक संवाद साधायला लागली. सोप्या आणि ओघवत्या भाषेत केलेल्या निरुपणाची पावती प्रत्येक रसिक तिच्यापर्यंत जसजसा पोचवत होता तसतसा तिचा जीव  सुखावत होता. त्यात दोघी नातसुना काढत असलेल्या फोटोंचं  आणि तिचं होत असणारं कौतुक पाहून त्यांच्या खुलुलेल्या चेहेऱ्यांचंही तिला मनोमन अप्रूप वाटत होतं आणि त्या स्नेहाने आतून आणखीन दाटून येत होतं.

झटकन तिचं मन ५० वर्षांपूर्वी तिच्या भूतकाळात गेलं. 

घरी छोटी सुमन, आई, बाबा , तिची ताई आणि धाकटा भाऊ असत. बेताची परिस्थिती. बाबांची फिरतीची नोकरी. आई शिक्षिका. बाबा सतत बाहेर त्यामुळे घरचा, मुलांचा भार तसा आईवरच. ती सतत घरकामात नाहीतर शाळेत गढलेली. सुमन १० वर्षांची होईतोवर हे सगळं ठीक चालू होत. नंतर आईची बदली तालुक्याच्या शाळेत झाली आणि रोज जाण्यायेण्यातच तिचे २-२ तास मोडू लागले. साहजिकच घरच सगळं ताईला पाहावं लागे. सुमन आता धाकटा भाऊ, शाळा, मैत्रिणी यात रमू लागली आणि ताईला घरकामात थोडी मदत करू लागली. मग ताई सुद्धा एक दिवस लग्न होऊन गेली आणि सुमन अजूनच घरकामात गुंतली.  

दरम्यान सुमनला पुस्तकांचा खूप लळा लागला. घरकाम, अभ्यास आणि धाकटा भाऊ यातून जरासा वेळ मिळाला की जे हाताला लागेल ते ती वाचून काढायची. शाळेतली लायब्ररी तिने वाचून वाचून संपवत आणली होती. जस तिचं वाचन तसंच लेखन. तिने लिहिलेले निबंध बाई इतर वर्गात जाऊन तिला वाचून दाखवायला सांगायच्या. खूप लिहीत जा, वाचत राहा म्हणायच्या. त्यावेळी तिला खूप छान वाटायचं.  हातात आलेल्या नवीन पुस्तकाचा फडशा पडायला ती कोण आतुर व्हायची. वाचनाच्या आणि एकपाठीपणाच्या जोरावर ती शाळेतल्या स्पर्धांमध्ये, स्नेहसंमेलनामध्ये हिरीरीने भाग घेऊ लागली. आंतरशालेय स्पर्धांमध्येही  तिने शाळेला वक्तृत्वाची अनेक बक्षीस मिळवून दिली. 

सुमनच्या या गुणांचं आई-बाबा, ताई यांना अगदीच कौतुक नव्हत असं नाही. पण ते तेवढ्यापुरतंच. किती का बक्षिसं मिळवेना ; शेवटी आज ना उद्या लग्न होऊन जायचीच आहे. इतकंच आणि एवढंच. 

मग एक दिवस शाळेतर्फे सुमनची निवड जिल्हा वक्तृत्व स्पर्धेसाठी केली गेली.  ती आनंदाने फुलून आली. कसून तयारी करायला लागली. ताई बाळंतपणाला आली होती घरी त्यामुळे आईने सुट्टी घेतली होती शाळेतून काही दिवस. सुमनने आई- बाबांकडून वदवून घेतलं की काहीही झालं तरी ते तिचं भाषण ऐकायला प्रेक्षकांमध्ये असतील म्हणून. करता करता स्पर्धेचा दिवस उजाडला. सुमनच्या बाई तिला स्पर्धेसाठी न्यायला आल्या. आई बाबा मागून जाणार होते. सुमनने आईला डोळयांतूनच "वाट पाहतेय" सांगितलं आणि ती उत्साहात निघाली. आज २००० विद्यार्थ्यांसमोर ती बोलणार होती. स्पर्धेची वेळ जसजशी जवळ यायला लागली तसतशी सुमनची नजर दाराकडे लागून राहिली होती. आई बाबा का नाही आले?  कुठे राहिले असतील?? धाकट्याला शेजारी ठेवून येणार होते, शेजारच्या काकू आनंदाने तयार झाल्या होत्या. मग ? असं का करतात हे ??? 

तेवढ्यात बाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला पुढे जायची सूचना केली. सुमन विचारातच स्टेज वर चढली आणि एका तंद्रीतच तिने भाषण केलं ; टाळ्या पडल्या, कौतुक झालं. स्पर्धेचा निकाल लगेच जाहीर झाला आणि तिला द्वितीय पारितोषिक मिळालं. बाई खुश झाल्या तिच्यावर पण सुमन मात्र मनातून हिरमुसली होती. कसबसं  हसत तिने ते सगळं स्वीकारलं. येतानाच्या प्रवासात बाई तिला समजावत राहिल्या. "अगं , आली असेल ऐनवेळी काहीतरी अडचण , जाऊ देत ग. तू इतकं छान यश मिळवलंस ना, आता हास पाहू. आई बाबाना, ताईला केवढा आनंद होईल घरी गेल्यावर."

बाईंनी समजूत घातल्यावर सुमन आई बाबांचं न येणं विसरून नाचत नाचत घरी आली. घरात पाय ठेवला तशी ताईने तिला आतल्या खोलीत यायचा इशारा केला. सुमन गेली आणि ती रागाने "का नाही आले ग आई बाबा" विचारणार एवढ्यात ताईने तिला तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगितलं. मग हळूच कानात सांगितलं "तुला बघायला आलीयेत मंडळी ; म्हणून नाही जमलं यायला आई बाबाना. आता पटकन तयार हो आणि जा बाहेर चहा पोह्यांचा ट्रे घेऊन." सुमन दिग्मूढ होऊन ताईकडे पाहत राहिली. पुढच्या तासाभरात यांत्रिकपणे आई ताई जे जे सांगतील ते ते सगळं तिने केलं. पण राहून राहून तिचे डोळे भरून येत होते. 

आई बाबा तिचं भाषण ऐकायला का येऊ शकले नाहीत याचं एकमेव उत्तर "तिच्या भवितव्याच्या चिंतेपायी, तिच्या भल्यासाठी" एवढच होत तर ! 

पुढच्या वर्षी सुमन लग्न होऊन सासरी गेली आणि संसारात झोकून देत तिने हे मागचं सगळं पुसून , रोजच्या रामरागड्यात गाडून टाकलं. तिच्या ट्रॉफी , सर्टिफिकेट माहेरच्या शोकेस मधून तिला वाकुल्या दाखवत राहिले.

आज तब्बल ५० वर्षांनंतर सगळ्या जबाबदाऱ्या निभावल्यावर तिला उसंत मिळाली आणि तिच्या जुन्या आवडीने पुन्हा उसळी मारली. साहित्य मंडळाची सभासद होऊन तिने हळूहळू आपलं वाचन, वक्तृत्व सगळं परत एकदा तासायला घेतलं. 

"सुमन आज्जी, किती छान बोलता तुम्ही पसायदानावर. आम्हाला कितीतरी गोष्टी माहीतच नव्हत्या. खूप स्वीट आहात तुम्ही. हे खास तुमच्यासाठी" असं म्हणत एका नातं सुनेनं तिच्या हातात फुलं आणि दुसरीने ज्ञानेश्वरांची सुबक मूर्ती दिली.

तिचे डोळे परत भरून आले. तिला का कोण जाणे, ज्ञानोबा माऊलींचे डोळेही खूप पाणीदार भासले. 

दोन्ही नातसुना आणि माऊलींच्या सहवासात तिच्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने "सुखिया झाला" होता. 

- नेहा लिमये 

No comments: