Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५३


रे 

लहानपणी संध्याकाळची दिवेलागणीची वेळ झाली की आम्हा मुलांना सक्त ताकीद होती. जो खेळ चालू असेल तो तिथे सोडून घरी परत यायचं, उशीर नाही करायचा. घरात येताना हात पाय धुवून मगच प्रवेश करायचा. मग अस्मादिक त्या आज्ञेचे तंतोतंत पालन करत असत

त्यावेळी घरात शिरतानाच एक सात्विक वास जाणवायचा नाकाला आणि आईने डाळ भात शिजत ठेवलाय हे समजायचं. खूप भूक लागलेली असायची पण आई देवापुढे निरांजन लावायची आणि आम्हाला लगेच परवचा म्हणायला बसवायची.

 गणेशस्तोत्र, अथर्वशीर्षमारुतीस्तोत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक , मग पाढे, त्यातही अडीचकी, निमकी, पावकी असली झेंगट असायची. एकूण तो प्रकार फार कंटाळवाणा वाटायचा पण आईच्या डोळ्यांचा धाक होता तेव्हा फार. मग खेळून झाल्यावर निमूटपणे देवघरासमोर बसायचं आणि सगळं म्हणल्याशिवाय  काही सुटका नसायची

कधी कधी आई सुद्धा आम्हा मुलांबरोबर परवचा म्हणायला बसत असे. तेव्हा तिची हात जोडलेली, डोळे मिटलेली मूर्ती मला फार आवडायची. कंटाळा आलाय, आज नको ना परवचा म्हणल्यावर ती जेवढी करारी असायची तेवढीच देवासमोर हात जोडल्यावर शांत, सोज्ज्वळ वाटायची.   

मी तिला नेहेमी विचारात असे, काय होतं हे रोज रोज म्हणल्याने ? देव तर भेटत, दिसत नाही कधी . मग का म्हणायला लावतेस ? ते ही रोज

ती हसायची. मला म्हणायची, मला एक सांग, रोज जेवायला कंटाळतेसपाणी प्यायला  कंटाळतेसश्वास घ्यायला कंटाळतेस? नाही ना, तसंच हे. आपण सवयी लावून घेऊ तशा असतं. हे तू जे वाचतेस, म्हणतेस रोज ते देवासाठी, देव भेटावा म्हणून नाही  काही. मला एक सांग, तुला नेमकं काय वाटतं, हे सगळं म्हणून झालं की ?

मी पटकन म्हणून गेले - कुणीतरी आपल्या सतत बरोबर आहे असं काहीतरी

आई हसली आणि तिने मायेने दृष्ट काढली माझी. म्हणाली , "हेच कुणीतरी असण असं वाटणं  असतं ना त्याने शंभर संकटांशी लढायचं बळ येत असतं ! कळलं का? पळा आता , बसा अभ्यासाला. "

मला तेव्हा कळायचं नाही पण नंतर घरावर आलेल्या कुठल्याही अडचणीच्या वेळी आईला मी पाहात असे तेव्हा नवल वाटायचं , इतका खंबीरपणा, विचारांचा ठामपणा हि आणते कुठून ? आता वाटतं नक्कीच ती देवाशी बोलत असणार रोज आणि तो ही रोज तिची सोबत करत असणार

देवाचं माहिती नाही पण मलासुद्धा अशी सोबत आहे आयुष्यभर तुझी. तुलाही कळतंच की मी उदास, अस्वस्थ, निराश असले की. आणि मग त्या अस्वस्थतेच कारण समजून घेऊन त्याचं निराकरण होईतोवर तू डोक्यावर बसतोस माझ्या. शिवाय आणि त्या बुचाच्या झाडाला पण काय काय सांगून ठेवतोस माझी काळजी घ्यायला. हो ना?

हे बघ, आत्ता सुद्धा डोलतय ते वाऱ्याने तुझ्या 'हो' मध्ये 'हो' मिसळून

जरा भेटायचं बघावं म्हणते मी आता!! 

(तुझ्या सोबत असण्याची सवय झालेली)मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: