Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ५६


रे

कोरं करकरीत मन कसं असतं ते पाहिलं आहेस तू कधी

कुठल्याही जुनाट जळमटांशिवाय, विशिष्ट मताच्या आग्रहाच्या सुरकुत्यांशिवाय, भूत-वर्तमान-भविष्य या त्रिशंकू मध्ये झुलणारं मन?? खरंच..... असतं का रे असं काहीकी हे आपापले मनाचे भास असतात?? आपणच समजूत घालतो का मनाची की इतके आपले अंदाज नाही चुकणार कधी, आपण शिकलोय की ओळखायला माणसं आता

हाहा, माणसं ओळखणं यासारखा खरं तर दुसरा कुठला धोकादायक खेळ नाही! चक्रव्यूहच की एक प्रकारचं आणि आपण त्यातले अभिमन्यू!! गुंतायला अवकाश लागत नाही पण सोडवायला दर वेळी आतमध्ये काहीतरी मरतच आपल्या. असेच थोडे थोडे मरत जगत असतो आपण. सगळी नाती बुडबुड्यासारखी वाटू लागतात आणि तरीही ते बुडबुडे आपण तळहातावर अलगद झेलत राहतो, फुटणार नाहीत या आशेवर

मग नवीन वाट सापडली तरी हे जुन्या अनुभवाचं भूत बसलेलं असतंच मानगुटीवर. म्हणजे धड जुन्यातून बाहेर पडणे नाही आणि नव्यात पूर्ण गुंतणे नाही

मन पाटीसारखं दर वेळी लख्ख का रे पुसता येत नाही? शाळेच्या पहिल्या दिवशी कोऱ्या वहीत नाव लिहिताना सगळं कसं नवीन आहे वाटायचं, तसं मनाचं का नाही करता येत काहीतरी

नकोत ती जळमट, नको त्या सुरकुत्या, नको तो त्रिशंकू, नकोच....काही नको

मन नावाचा अवयव बाजूला काढून ठेवता यावा थोडा वेळ तरी, अशी सोय हवीच

बुचाची फुलं कधी येणार रे? आला की पाऊस आता. अरे हो, तू कुठे आलास पण इथे?

काय आहे ना, नुसती तुझ्या येण्याची चाहूल सुद्धा पुरते काही वेळा. मन शहाणं आहे रे माझं तेवढं.
(मनाची पाटी पुसायला बघणारी) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: