Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १४



रे 

काल "चहा" या विषयावरून चर्चा रंगली होती ऑफिस मध्ये. चहा चांगला कि वाईट यावर आधी एक परिसंवाद रंगलाच. मग त्यानंतर जरा तात्विक चर्चा सुरु झाली. म्हणजे चहा चांगला का वाईट हे नंतरच झालं. मुळात आधी चहाची ऑफर accept करावी का नाही ; या मुद्द्यावर काथ्याकूट झाला

"कुठेही गेलो कामासाठी कि चहा हवा का विचारतात ; मग हो म्हणावं कि सरळ नाही म्हणावं?" 

"ज्यांना कॉफी आवडते त्यांच्यासमोर तुलनेने कमी प्रश्न / पर्याय असतात !"

"हो म्हणलं , तर पुढे प्रश्न मालिका ; अर्थात ऑपशन्स येतात - विथ / विदाउट मिल्क , मशीनचा / हाताने बनवलेला, साखर / बिनसाखरेचा , आल्याचा / बिन आल्याचा, ग्रीन टी / हर्बल टीनॉर्मल टी ..... बापरे !! चहा नको पण प्रश्न आवरा, असं वाटायला लागतं"

"नाही म्हणावं , तर समोरच्याचा हिरमोड होतो किंवा मग कॉफी / जूस (प्रसंगी कोक / ताक सुद्धावगैरे काहीतरी घ्या असा आग्रह होतो."

खरं तर किती सरळ सोट प्रश्न - पण ही चर्चा चालू असताना सरळ दोन तट पडले होते , चहा "नकोच" म्हणायचं किंवा सरळ नॉर्मल चहा सांगून "जसा येईल तसा" चहा पिऊन मोकळं व्हायचं. मग शेवटी बॉल चा रोख माझ्या दिशेने आला..... मॅडम तुम्ही सांगा !! 

मी काय बोलणार ? चहाच माझं प्रेम तुला माहितीचे !! कॉफी माणसाला संवाद साधायला  परावृत्त करत असेल तर चहा माणसाच्या मनातली गुपित उघडी पाडतो हा माझा अनुभव. आधी आधी मी हि नाही म्हणायचे चहाला. पण मग एका क्लायंटने मला समजावलं " अहो मॅडम, चहाला नाही म्हणू नका - नसेल प्यायचा तर नका पिऊ , एक-दोन घोट प्या आणि ठेवून द्या. पण यांतून गोष्टी साध्य होतील  - 

एक, तुम्ही दुसऱ्याचा शब्द राखताय याने क्लायंटला  तुमच्याबद्दल comfort  येतो. (त्याच्याच भाषेत सांगावं तर "चाय को काटो मत ; पूछा है तो पिनी पडेगी ! ") आणि हि फक्त सुरुवात असते - एखादी गोष्ट त्याच्या गळी उतरवण्याची आणि सहज संवाद साधायची

दोन, चहाच्या निमित्ताने तुम्ही समोरच्याचे आणि समोरचा तुमच्या "वेळेमध्येभागीदार होता. निदान चहा संपेपर्यंत तरी तुम्हाला त्याचं आणि त्याला तुमचं बोलणं ऐकून घ्यावंच  लागतं; तेवढा वेळ हक्काचा असतो दोघांचा . कधी त्यातून रखडलेले काही निर्णय मार्गी लागतात ; कधी काहीच घडत नाही. पण हि चर्चा होणं महत्वाचं असतं 

मला पटलं रे त्याचं  ... तेव्हापासून मी चहाला नाही म्हणणं सोडून दिलय. चहा "पिणं" हे महत्वाचं नसून तो पिण्यासाठीच "उत्साह दाखवणं" हे महत्वाचं आहेसगळ्याच वेळी तुम्ही एखाद्याच्या प्रत्येक गोष्टीत बरोबर असलंच पाहिजे असं नसतं ; शिवाय ते व्यवहार्य सुद्धा नाही , पण तुमचा "प्रेझेन्स" , नुसतं "मी आहे" हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. हे लक्षात आल्यावर आमच्या ऑफिसची जनता एकदम "युरेका मोमेन्ट" असल्यासारखी चिडीचूप झाली आणि त्या वादावर पडदा पडला एकदाचा

बघ ... आत्तापर्यंत सगळेजण चहाचे चांगले- वाईट परिणाम , प्रोटोकॉल्स , ऑफिस एटीकेट्स इतक्या भवतीच घुटमळत होते. पण हे सांगितल्यावर चहाच्या ऑफरकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला प्रत्येकाचा.

रोजचीच  गोष्ट.... किती छोटीशी ... पण दृष्टिकोन बदलला कि किती वेगळी नजर मिळून जाते नं आपल्याला त्याकडे बघण्याची. मला आवडलंय हे

मी तर बुचाच्या झाडाला पण सांगितली हि गोष्ट ; तर त्याने लगेच विचारलं "अगं पण , तो येणारे कधी; त्याचा हातचा चहा आवडतो तुला! " 

बघ..आता त्यालाही कळलंय ; पण तू काही लक्ष देत नाहीस ! थोडक्यात महाशय, चहाच्या निमित्ताने का होईना पण आपला वेळ बुक करून टाकुयात आधीच ! कधी येतोस मग ?? 

(तुझ्या हातच्या 'एक प्याली चाय' च्या प्रतीक्षेत) मी 



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: