Search This Blog

Monday, November 12, 2018

लघुकथा १- "आज"


हातात वाफाळत्या कॉफीचा मग आणि जोडीला रितं मन घेऊन ती बाल्कनीत उभी राहिली.....

बास आता....कंटाळा आलाय जगायचा. लग्न-नोकरी-घर-मुलं-बाळ-दुखणी-खुपणी-सासर माहेर-मुलांची शिक्षणं-नातवंड.......सगळं पार पडलं वेळच्या वेळी. सगळे सुखात आहेत. अगदी "तो" सुद्धा जिथे आहे तिथे !!

जगायचा मोह सुटत नाही म्हणून जगत गेलो....आताशा वाटत, सगळचं छान तर आहे, करण्यासारखं काही राहिलं नाही....मरण यावं म्हणजे सुटका होईल. मरणाचा पण मोहच की !!!

"आज आत्ता या क्षणात जगायला शिका".....कुठेतरी वाचलेलं तिनं.....म्हणजे, "आज"च्या जगण्याला "काल"चे संदर्भ लावायचे नाहीत आणि उद्या मध्ये डोकावून बघायलाही जायचं नाही. जे आत्ता, या क्षणी आहे ते भोगून मोकळं व्हायचं. 'काल काय घडलं आणि उद्या काय होणार' च्या मोहात अडकलं की कालपासून आजपर्यंतचा आणि पर्यायाने उद्याचा होणारा प्रवासही निरस वाटू लागतो. 

 .....थोडक्यात, मोहापासून सुटका हवीये....सगळ्याच !!! बास झालं.........

आज्जी........नातू school van मधून उतरला....एवढेसे चिमुकले हात हलले तिला हाक मारत आणि गालभर हसू पसरलं तिच्या, त्याला असं बघून........ मायेनं दाटून आला ऊर  !

कॉफी एव्हाना संपली होती... आता भरल्या मनानं ती "आज" खायला काय करूया म्हणत "उद्या"चं दार उघडायला सज्ज झाली.



-नेहा लिमये 

(पूर्वप्रसिद्धी - नुक्कड फेसबुक पेज द्वारा बुक हंगामा .com )

टीप: - या कथेवर 'नुक्कड टी. व्ही' या you tube चॅनेलतर्फे विडिओ बनवण्यात आला , त्याची लिंक खालीलप्रमाणे- 

https://www.youtube.com/watch?v=S-7j94fzgNI

No comments: