Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ४४


रे

काल जुने फोटो काढून बसले होते कॉलेजमधले. आपल्या ग्रुप मधले सगळे इतके नमुने दिसत होते ना एकेक, बघून हसू येत होतं. मग आपण 2 वर्षांपूर्वी भेटलो होतो तेव्हाचे फोटो समोर आले. आधीच्या 20 जणांपैकी आपण फक्त 8 जणच भेटू शकलो. कुणी दुसऱ्या शहरात, कुणी भारताबाहेर, कुणी शहरात असून कुटुंबामुळे, नोकरी/व्यवसायामुळे व्यस्त आणि 3 जण तर हे जगच सोडून गेलेले !!

कॉलेज मध्ये असताना किती स्वप्न रंगवायचो, किती प्लॅन्स आखायचो आयुष्यात कायकाय करायचं याचे. त्यासाठी किती छंद लावून घ्यायचो एकेक. आता एवढ्या वर्षानी मागे वळून पाहिलं तर हातावरून पारा घरंगळुन जावा तसं वाटतं सगळं.

आयुष्यात सगळंच इतकं अनिश्चित का असतं रे? 

अगदी जन्माच्या आधीपासून डिलिव्हरी नॉर्मल होईल की काही कॉम्प्लिकेशन होईल, बाळ मोठं झाल्यावर हवी ती शाळा मिळेल का, दहावी नंतर हव्या त्या शाखेत हव्या त्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल का, बाहेरगावी राहावं लागलं तर जेवणापासून मेडिकल ची सोय कशी असेल, पुढे- नोकरी/ व्यवसाय, लग्न, मुलं बाळ, आजारपण....या ना त्या कारणाने अनिश्चिततेची आवर्तने सुरू राहतात आणि आपण त्या तालावर नाचत राहतो. 

नाचता नाचता पावले थकतात, आपण अनुभवाचे बोट धरून तरीही पुढे जात राहतो, आशेच्या छायेखाली विसावतो आणि पुन्हा पावले थिरकू लागतात. कारण अनिश्चितता सोडल्यास बाकी काहीही निश्चित वा शाश्वत नाही हे कळून चुकते तोवर. या नाचण्यातही एक उन्माद असतो सुरवातीचा, तो ही हळू हळू अनुभवाच्या तासणीवर घासून घासून गुळगुळीत होतो आणि उद्वेगात बदलतो बरेचदा. उद्वेग तरी किती करणार, म्हणून मग अनिश्चितता सवय बनते, मुरते आणि एक दिवस तिने व्यापलेल्या देहाची , जीवनाची रक्षा विसर्जित होते, करावी लागते. तिथेही परत कावळा शिवेल का आणि मुक्तीचा मार्ग मोकळा कधी होईल याची अनिश्चितता असतेच.

थोडक्यात काय, Uncertainty kills !! अनिश्चितता मारून टाकते !!!

तुला नाही असं वाटत?? 

आंब्याला मोहोर आलाय. बुचाच्या झाडाला फुले यायला फक्त ४ महिने राहिले.

काही गोष्टी तरी निश्चित असाव्यात आयुष्यात, जवळ नसल्या तरी हरकत नाही.... नाही रे?? 

(आपल्यातले निश्चित-अनिश्चिताचे किनारे मोजणारी) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: