Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३०


मनू

तुझी सगळी पत्रे मिळाली ... 'मोठे झाल्यावर परत लहान होता येणे' याला दुसरा काही पर्याय नसतोच का मनू ??

तुला छान काहीतरी उत्तर लिहावे जेणेकरून तुझी साकळलेली भीती कमी होईल असे वाटले म्हणून लिहायला बसलोमाझ्यासमोर कागद आहे, पेन आहे पण अक्षरे उमटत नाहीयेत. मनात असंख्य शंका आहेत, काळजी आहे, अस्वस्थता आहे, असुरक्षितता आहेया सगळ्यांमुळे मनातली अक्षरे मनातच जिरून जात आहेत. एखादा विचार , त्याला जोडून येणारी मेंदूतली कंपने, हृदयाचे वाढलेले ठोके आणि हातांचे चलन या सगळ्यांना अर्धविराम दिल्यासारखे वाटते आहे मला. असे का व्हावे याचे कारण मी गेले कित्येक दिवस शोधू पाहतो आहे  आणि मला ते किंचितसे लक्षात आलेय असे वाटते

माणसाला सगळ्यात जास्त भीती कसली असते माहिती आहे, मनू ? आपला जीव ज्या व्यक्ती, वस्तू मध्ये गुंतलेला आहे ती व्यक्ती किंवा वस्तू दूर गेली किंवा गहाळ झाली, हरवली तर काय, याची. एकवेळ गहाळ होणे, हरवणे सुद्धा समजू शकतो मनू पण जर त्या व्यक्तीने अलिप्त राहायचे ठरवले तर काय?  

जगण्याची अखंड धडपड करताना माणूस प्रत्येक वेळी जवळच्या व्यक्तीचे संदर्भ त्याच्या प्रत्येक कृतीला जोडू पाहतो, काही धागे चिवट असतात, काही सहज तुटणारे. पण जे आहे ते हातात गच्च पकडून ठेवणे त्याला महत्वाचे वाटते त्या क्षणी. रेतीने भरलेली मूठ त्या क्षणी भरल्यासारखी वाटत असली तरी रेती निसटून जातेच हातातून. रेतीमध्ये हाताने गिरवलेली अक्षरे सुद्धा पाण्याखाली जातात. हे माहिती असून देखील माणूस रेती धरू पाहतो, ती अक्षरे गिरवू पाहतो कारण त्याला ते क्षण पुन्हा पुन्हा जगायचे असतात, अनुभवायचे असतात... जगण्याचे संदर्भ मिळतात ते या अशा क्षणातूनच.  

पाउलो कोहेलो काय म्हणतो माहितीय ... Sometimes life is very mean: a person can spend days, weeks, months and years without any new emotion. Then, when a door opens - a positive avalanche pours in. One moment, you have nothing, the next, you have more than you can cope with.”

कधी कधी माणूस काही दिवस, आठवडेमहिने, वर्षे  भावना विहीन जगतो आणि अचानक एक दिवस त्याच्यासमोर नवीन प्रकाशवाट येते; त्या वाटेवर फुलांचा बिछाना अंथरलेला असतो. एका क्षणी तुमच्याकडे काही नसते आणि दुसऱ्याच क्षणी इतके असते कि जगणे पेलवत नाही. आयुष्य अशा अर्थी तुम्हाला चकित करत राहते

थोडक्यात माणसे जपावीत पण त्यांना बांधून ठेवू नये. त्याने आपण पुढे निर्माण होणाऱ्या नवीन शक्यता दाबून, चेंगरून टाकतो आणि फक्त धडपड उरते मग जगण्याची . म्हणूनच पुढच्या वाटेला जागा ठेवावी म्हणजे जुन्या वाटा सुटल्या , सरल्या तरी आपण "जगत राहतो", नुसतेच जिवंत राहत नाही

आता ह्या क्षणी हे लिहून झाल्यानंतर मी खूप निश्चिन्त आहे. आता माझ्या मनातली अस्वस्थता कमी झाली आहे. का माहितीये , कारण हे पत्र हातात पडेपर्यंत मी तुझ्या दारात उभा असेन .... चहाचे आधण टाकून ठेव. आलोच ! आणि हा, यावेळी बुचाच्या फुलांची वेणी घेऊन येतो आहे मी तुला आवडते तशी !!

( आणखी काही लिहायची गरज आहे का?.... याचे उत्तर माहित असलेला ) रे 



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: