Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३५


रे

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कुठल्या न कुठल्या आवाजाशी जोडले गेलेले असतो.... पक्ष्यांचा किलबिलाट, घड्याळाचा गजर, मंदिरातला घंटारव, मशिदीची अजान, कुकरची शिट्टी, दारावरची बेल, गाड्यांचे हॉर्न, स्कुटरची किक, भाजीवाल्याची हाळी, शाळेतली प्रार्थना, फोनची रिंग, ट्रॅफिकचे, गर्दीचे सामुदायिक आवाज !! 

हे सगळे आवाज आपल्याला ऐकू येतात, कशापासून तरी निर्माण झालेले असतात म्हणून आपण त्यात असतो, आपण ऐकतो, ओळखतो असे आवाज........  'आहत नाद' . 

पण एक असाही आवाज नाद असतो जो अनिर्मित असतो तरी आपल्याला जाणवतो. कानांना ऐकू येत नाही पण मनाला ऐकू येतो. हाच तो आवाज....जो जाणिवांमध्ये नाही, नेणिवेत आहे - जो जाणवतो म्हणून आहे पण आहे म्हणून जाणवत नाही. ओशो म्हणतात तसा तो अनिर्मित आहे , निर्ध्वनी आहे आणि तरीही "नाद" आहे..... अनाहत नाद !! 

काय गम्मत आहे बघ, ध्वनीची अनुपस्थिती (निर्ध्वनी) म्हणून तो अनाहत आणि जाणवतो म्हणून तो नाद !विरोधाभासात सुद्धा अशी संगती असते, रे ! !

उदाहरणच द्यायचं झालं, तर तू येतोस, माझ्या समोरच्या खुर्चीवर बसतोस, आपण खूप बोलतो , मग तू निघून जातोस. पण तुझी अनुपस्थिती जाणवत राहते....तू जिथे बसला होतास त्यातून तुझं हसणं, बोलणं, चालणं, बोलता बोलता तुझं गप्प होणं सुद्धा तू गेल्यानंतर वाजत असतं एखाद्या गाण्याप्रमाणे माझ्या मनात. मला ते ऐकू येत नाही कारण त्याला ओळखीचा असा ध्वनी नाहीये आणि तरीही मला ते ऐकू येत कारण त्याला त्याचा असा एक अंगभूत आवाज आहे! 

माझी सगळी गात्र  एकवटून मी ऐकत राहते तो आवाज....माझ्याही नकळत माझ्या श्वासांना त्या आवाजाची लय मिळते आणि मग तो आवाज मला तुझ्या 'नसलेल्या' अस्तित्वाची जाणीव करून देतो.

हाच अनाहत नाद मला सांगतो....की तू नसलास तरी आहेस तू इथेच.... आसपास.... सतत...... सदैव ! 
ती बघ.....बुचाची फुलंही वाऱ्याशी बोलत पडद्याला हलकेच हेलकावे देत माझ्या पायांशी येऊन विसावली आहेत...अनाहतपणे !! ऐकतोयस नं??? 

(तुझ्या-माझ्यातल्या अनाहताशी एकरूप) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: