Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # २२



रे 

आज खूप पाऊस पडतोय इकडे. बुचाची फुलं हळू हळू आपलं अस्तित्व दाखवायला लागलीयेत. संध्याकाळी बाल्कनीत उभं राहिलं  कि नुकत्याच उमलू लागलेल्या कळ्या हसतात माझ्याकडे बघून. माझ्या कॉफीची वेळ असते ती हे ठाऊक झालय त्यांना

पावसाच्या सरी उलगडताना बुचाच्या फुलांचा मंद सुगंधही घुंगराच्या पावलांनी येतो घरात. मातीचा ओला दरवळ आणि हा सुगंध बेमालूमपणे मिसळतात एकमेकात....मनावर धुंदी आणणारा तो परिमळ श्वासात भरून घ्यायला फार आवडतं मला

ती धुंदी ओसरली की मी पाऊस बघते. टिपटीप पावसाचे थेंब बाल्कनीच्या गजांवर साठत राहतात. गजांच्या चौकटीत हलकेच बोट ठेवून ते थेम्ब त्यावर झेलायला मला आवडतात , एक थेम्ब झेलला कि लगेच दुसरा , तिसरा .... त्यांना ओघळू द्यायचं नाही खाली. हा खेळ बराच वेळ खेळते मी. थेम्बानाही आवडत असावं त्यांनी विरून जाण्याआधी कुणीतरी त्यांना अलगद सावरलेल !! 

मग मी कॉफी घेते आणि पावसात भिजलेल्या बुचाच्या झाडाला न्याहाळत बसते. त्याचं मजबूत खोड , मुळालगतची भुसभुशीत माती , विस्तारलेल्या फांद्या, एकमेकात हरवलेली पानं, झुकलेले कळ्यांचे घोस, अलगद पानांचा पडदा दूर सारून अधेमधे डोकावणारी फुलं!! कधी एकदा अंगण त्या फुलांनी भरून जातंय आणि वेचतेय मी असं होऊन जातं मला. मागे मी म्हणाले होते तस, एक एक फुल वाचताना तुझी एक एक आठवण...आठवण कसली, साठवण ती माझ्याकडची

ओचा भरून फुलं मावेनाशी होतात आणि मन भरून तुझ्या आठवणी. काय करू ह्यांचं सांग?? 

हा दिवसभराचा कार्यक्रम, तर रात्री बुचाच्या जोडीला सोनचाफा सुद्धा येतो बरं का. हे फार झालंय आता.
तू इथे नाहीस म्हणून मागे अशी सोय करून गेलायस....तुझ्यामाझ्यातली रात्र अशी वाटून दिलीयस दोघांना आणि ही दोघे ते काम चोख बजावतायत. काय करू मी तुझं??

एकच सांग....मला सोबत व्हावी म्हणून चाफा लावून गेलास ना? पण तू हा जीवघेणा एकटेपणा कसा साहतोस ??? सांग ना.....

(बुचाची फुलं आणि चाफा तुझ्या सोबतीला पाठवणारी) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: