Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १६


रे 

काही जागा या फक्त "आपल्या" असतात खास. किंवा असं म्हणूयात, त्या आपलंसं  करून घेताततिथे जरावेळ रेंगाळलं तरी मन प्रसन्न होतं , आठवणी ताज्या होतात ... एक दिलासा मिळतो;  कुठूनही दमून भागून आलो तरी त्या तिथे गेलो कि शीण नाहीसा होणार, मनाला पालवी फुटणारच परत !!

अशीच "माझी" होऊन गेलेली एक जागा...तुझ्या घरात शिरल्या शिरल्या समोरच असलेली खिडकी, त्याला लागून असलेला कठडा, त्याला टेकून एक छोटी सेटी. त्या सेटीवर पालथी मांडी घालून  आणि कठड्यावर कोपरं रोवून कितीतरी वेळ खिडकीतुन बाहेर बघत बसलेली मी.  एका हातात तू केलेला चहा आणि दुसऱ्या हाताशी डायरी आणि पेन. तू शेजारी बसलेला .... माझं निरीक्षण करत. अशात पावसाचा शिडकावा सुरु होतो. पहिला पाऊस...... मातीचा वास ... शेजारी तू .... आणखीन काय लागत जगायला सांग !!

मग तुझा नेहेमीचा प्रश्न ... कसं सुचतं तुला लिहायला .....मी हसते फक्त. खरं  तर सुचत नसतंच मला काही, तू शेजारी असल्यानंतर. तेव्हा फक्त तू सुचत जातोस आणि आणखीन कळत जावास इतकच वाटतं. पण त्याने तुझं समाधान होणार नसतं. तुझा चष्मा माझ्याकडे रोखून बघत असतो....उत्तर द्यावच लागेल.... मी हळूहळू मोकळी होते... 

मी आहे म्हणून मला काही सुचतं असं नाहीये रे... शब्द बोलावतात मला ... मी फक्त ती हाक ऐकते आणि त्यांना वाट करून देते कागदावर... त्यात साहित्य वगैरे काय आहे; आहे का नाही ते इतरांनी शोधावं ! मुळात इतरांनी काहीतरी शोधावं  म्हणून मी नाहीच लिहीत. मी मलाच नव्याने सापडत जाते प्रत्येक वेळी लिहिताना म्हणून मी लिहिते. मला आवडते ही प्रक्रिया. भावनांचा, विचारांचा तिढा , गुंता सुटतोच असं नाही त्याने पण मी रिती होते, नवीन मिती दिसतात मला त्याच त्याच प्रश्नांच्या , नवीन उकल सापडते काही वेळा ... मी भिडू शकते मग रोजच्या चाकोरीबद्ध जगण्याला..... शब्द जगायला बळ देतात मला

तुझा चष्मा आता खिडकीतून बाहेर बघत असतो... बरंच काही जाणवल्यासारखा. ओठांच्या कोपऱ्यात हसू उमटायला सुरवात होते ... 

खरं तर तुला हे कळून घ्यायचच नसतं मुळी .... मला असं बोलतं करून माझ्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद तुला पाहायचा असतो. हो नं ? 

पण तुला हे माहितीये का ...  त्या वेळी आपण दोघंही बुचाचं झाड झालेलो असतो एकमेकांसाठी !! म्हणून तर रे .. काही जागा "आपल्या" असतात ...खास "आपल्या"!! 

आणखीन काय बोलू ? .... ये !

- ( तुझ्या मनाच्या खिडकीत अधून मधून रेंगाळणारी ) मी 



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: