Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ८


रे 

उन्हाळ्याचा दाह वाढत चाललाय....पाणी पाणी होतंय सारखं. रस्त्याने जाताना दुतर्फा असलेली झाडं अगदी ओकीबोकी झालीयेत. त्यामुळे पक्ष्यांची घरटी पण अगदी सहजच दिसतात लांबून सुद्धा. त्यांच्या इवलुश्या पिल्लाना कोण देत असेल रे सावली अशा भर उन्हात ? आई -बाबा अन्नासाठी बाहेर पडतात आणि केव्हातरी परततात घरट्याकडे ; तोवर कोण बघत असेल त्यांना ? त्यांची तीच वाढत असतील, धीट होत असतील, एकमेकांना धरून, सावरून, सांभाळून राहायला शिकत असतील का रे

पुणे स्टेशन कडे जाणारा जो पूल लागतो त्याच्या दोन्ही भिंतींमध्ये पाणी जायला कपारी ठेवल्यात... त्यात चिमण्यांनी आपली घरं केलीयेत. कपारीत ओलावा राहतो आणि शिवाय एवढ्याशा फटीतून मांजर, कुत्री वगैरे यायचा संबंध नाही, आत अंधार असला तरी रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात आई अन्न आणताना दिसत असेलच आणि पिल्लांना भरवताना आई पण निर्धास्त असेल ... ... किती विचार करून घर बांधलं असेल आणि पिल्लाना वाढवलं असेल ना त्यांनी !

मला कौतुक वाटत रे पक्ष्यांचं. किती सतत कामात असतात , त्यातही शीळं  घालत गुणगुणतात. आपल्या इवल्याश्या पंखांच्या मर्यादा जाणतात पण त्या मर्यादेत सुद्धा देवाने दिलेलं  आयुष्य इमाने इतबारे सुंदर करतात. आपण बाकीच्यांसारखे नाही म्हणून गंड बाळगत बसता आपण आहोत तसे जगतात. आणि हो, "जगतात" बरं का, आपल्यासारखे नुसतेच  "जिवंत" नसतात ते. म्हणूनच त्यांची पिल्लं सुद्धा तशीच होत असणार नाही
पक्ष्यांकडे बघून आपण माणसं कधी शिकणार रे ? तळहाताच्या फोडासारखं  जपतो आपण पिल्लानाआपल्याला मिळालं नाही म्हणून आपल्या पिल्लांना सगळं मिळावं , त्यांना खस्ता खायला लागू नये , म्हणून जन्मभर आपण स्वतःला एका चक्राला बांधून घेतो. चुकतो का रे आपण ? कपारीतल्या ओलाव्याने कुडकुडतील  आणि उन्हाच्या कडाक्याने पोळतील म्हणून सतत पंखांखालीच ठेवतो आपण. का नाही त्यांना जरा झळ लागू देत उन्हाची आणि चव लागू देत झोडपणाऱ्या पावसाची ?? काय हरकत आहे ?? आपणही त्यातूनच पडलो ना रे तावून सुलाखून  बाहेर

वरवर पाहता स्वच्छंदी वाटणाऱ्या पाखरांच्या आयुष्याला सुद्धा एक नेमस्तपणा असतो, आखीव जागा असतात आणि एकमेकांना धरून राहण्यातच भलं आहे हा उपजत शहाणपणा असतो... माणसाची पिल्लं कधी अशी शहाणी होतीलमला तर माझ्या पिल्लाना त्यासाठी एखाद्या पक्ष्याकडे ठेवावं एक वर्षभर तरी ; अस कायम वाटत आलय. पिल्लच कशाला, खरं  तर आपण पण जाऊन राहायला पाहिजे असं कैकदा वाटत आलंय  मला
बहिणाबाई आणि सुगरणीचा खोपा  ..... यावरच तर मोठे झालोय ना रे शेवटी आपण !!

बुचाच्या झाडावर यंदा साळुंक्यांचा बेत आहे घरटं  बांधायचा..... काडी काडी जमवत घिरट्या घालणं चालूये त्यासाठी. हे लोभसवाणं दृश्य पाहायला तू इथे असायला हवास !! 

इतकंच... 

- (एखाद्या पक्ष्याने तुझा निरोप आणावा लवकर या आशेवर असलेलीमी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: