Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # २१


रे 

परवा कप्पा आवरायला काढला आणि drawing ची वही सापडली. शाळेत असताना एलिमेंटरी परीक्षेला बसले होते तेव्हाची वही .... व्यक्तिचित्र, still life , निसर्गचित्र (landscape) .... कित्तीतरी प्रकार

वेगवेगळ्या रंगांचे मनमुक्त मारलेले फटकारे, कधी संयतपणे एकाच रंगाच्या डार्क ते लाईट शेड्स आकारलेल्या. मग वेगवेगळ्या मटेरियलने रंगांचा पोत अभ्यासून बघितलेला..... काच, भेंडी, दात घासायचा ब्रश , कापूस,  हाताची बोटं , काडेपेटीची काडी , कंगवा .... काही काही शिल्लक ठेवलं नाही मी. मग वेगवेगळ्या size चे  ब्रश वापरून रंगांच्या शेपट्या कागदावर ओढून झाल्या. caligraphy च्या किट मधल्या निब्सनी पण प्रयोग केले होते मी

रंग नेहेमी आपलेच वाटत आले.. त्यांच्या सगळ्या छटा, पोत, गहिरेपणा, एक-दुसऱ्याबरोबर असलेला बंध, कधी पूरक तर कधी विरोधी भूमिका, कधी नुसतीच किनार तर कधी ठाशीव अस्तित्व ... .. उद्देश एकच.... celebrating life , the journey of life !! नाही ???

जगणं असं सेलिब्रेट करता यायला हवं .... जन्मापासून जी रंगपेटी खुली होते त्याने रंग भरता यायला हवे आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात !! 

तुला आठवतंय ... मी चित्र तुझ्याकडून काढून घ्यायचे आणि रंग मात्र मी भरायचे. तू सुद्धा विना तक्रार मला  हवे ते रंग भरू द्यायचास त्यात. असं इतकं समजून उमजून आपल्या आयुष्याचा कॅनव्हास दुसऱ्याच्या हातात सोपवायला ठाम विश्वास लागतो मनात.  कसं जमतं तुला हे.....  तूच तो मानसीचा चित्रकार खरा  !!!

आज बुचाची फुलं, एक्झोरा आणि सोनचाफा .... तिन्ही एकत्र फ़ुललेत. कुठले आणि किती रंग पाठवू तुला सांग या पत्रातून ?? 

(तुझ्या चित्रात अजूनही रंग भरायला आवडणारी) मी 



पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: