Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ३८


रे 

पुस्तकं वाचताना भारी वाईट खोड आहे  माझी - वाचनातून ब्रेक घ्यायची वेळ झाली की ज्या पानावर असू त्या पानाचा कोपरा दुमडून ठेवायचा. यावरून मी कित्येकदा बोलणी खाऊन झाली आहेत. माझ्या एका मैत्रिणीने छान बुकमार्क बनवून दिल होत मला. यथावकाश कुणी कुणी प्रेमाने बनवून दिलेल्या बुकमार्क्स मध्ये क्रॉसवर्ड , अमेझॉन वगैरेंच्या बुकमार्क्सचीही भर पडली. पण माझी सवय काही गेली नाही. काय कोण जाणे बुकमार्क ठेवलं तरी कोपरा दुमडला नसेल  तर पुस्तक ब्रेकनंतर परत हातात घेताना काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे बुकमार्क आणि दुमडलेले कोपरे दोन्ही असतात पुस्तकात खूण म्हणून. माझ्यासारखी वेडी मीच; हो की नाही ?? 

अशीच अजून एक सवय - वाचता वाचता अडलेले शब्द, महत्वाची वाक्य वगैरेखाली पट्टी पेन्सिल घेऊन शिस्तशीर खुणा करण्याची. मला वाकड्या तिकड्या रेघा आवडत नाहीत; म्हणून पट्टी घेऊन आखते मी रेघा. समासात अडलेल्या शब्दांचे अर्थ लिहिलेले असतात. एखादं वाक्य फारच आवडलं असेल तर डबल अंडरलाइन असते त्याखाली ; ती सुध्दा पट्टीनेच बरं का. माझी मैत्रीण मला गमतीने म्हणायची -  तुझ्या  खुणा इतक्या रेखीव असतात कि कुणाला नोट्स काढायच्या झाल्या तरी सहज जमेल !

आता समज, माझं पुस्तक मी दुसऱ्या कुणाला उधारीवर दिलं असेल आणि त्याने/ तिने त्यावर बेढब अक्षरात काही लिहून ठेवलं, पेन्सिल सोडून पेनाने लिहून ठेवलं किंवा रेघोट्या ओढल्या, कोपरे दुमडले आणि वाचून झाल्यावर सरळ केले नाहीत; तर माझ्या रागाचा पारा चढलाच म्हणून समज ! ती व्यक्ती लगेच अस्मादिकांच्या "बॅड बुक्स" मध्ये जाते ! यामुळे बऱ्याच व्यक्ती दुखावल्या गेल्यात माझ्याकडून, पण माझं पुस्तकवेड माहिती झाल्यावर कित्येक जण जोडले देखील गेले आहेत. 

माझा पुस्तकांवर खूप जीव आहे रे. मी खूप जपते त्यांना. पुस्तकं माझे सखे सोबती आहेत अनेक वर्ष आणि मी त्याच भावनेने त्यांना जपत आले आहे. एकटेपणात माझी साथ त्यांनी कधीच सोडली नाही आणि गर्दीत असताना सुद्धा मी त्यांची. 

हे सगळं तुला सांगत बसले कारण तू दिलेलं "कृष्णकिनारा" हाती लागलं परवा. त्यावर तुझ्या हस्ताक्षरात लिहिलेल्या माझ्या नावापाशी आणि पहिल्याच पानाच्या दुमडलेल्या कोपऱ्यापाशी बराच वेळ रेंगाळले. 

काही कोपरे कायमचे दुमडलेलेच बरे असतात , नाही ??

इति पुस्तकस्तोत्रं संपूर्णम !!

("बुचाची फुले"वर एखादं पुस्तक लिहू का ?) या विचारात मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: