Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १८



रे 

आजकाल मला प्रश्न पडतात खूप, म्हणजे तसे ते नेहेमीच पडतात पण आताशा मी उत्तरं मिळणार नाहीयेत माहिती असून सुद्धा प्रश्नांभोवती घुटमळत राहते म्हण

मी का जगतेय ?  माझ्या जगण्याचं , मी कोणाच्यातरी आयुष्यात असण्याचं किंवा नसण्याचं नेमकं प्रयोजन काय असावं ?  मी जे जगतेय त्याला खरंच जगणं म्हणतात का ? मी नसेन एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात तर असा काय फरक पडणारे त्या व्यक्तीला ?? 

हे असे प्रश्न यायला लागले कि मी धास्तावते रे, स्वतःचीच भीती वाटायला लागते मला.  मी स्वतःला अजून कोशात बंदिस्त करू पाहते. एखाद्या अंधाऱ्या खोलीत कोंडून घातल्यासारखी. पण त्या खोलीच्या दारातून एखादी प्रकाशाची तिरीप यावी, तसं त्या कोशात असताना तू आठवत जातोस

तुझा आश्वासक आवाज , समजूतदार स्पर्श , धीराचे बोल सगळं सोप करून टाकतात आणि अवघड सुद्धा. अवघड अशासाठी की तुला ऐकत असताना, पाहत असताना माझ्या घशात दाटलेला आवंढा त्यावेळी बाहेरच पडत नाही. मला तुझा आधार एकाच वेळी हवासा वाटतो आणि नकोहि. तू निघून गेलास  सोडून अचानक तर.... तर माझं काय होईल .... म्हणून मी तुला लांबच ठेवू पाहते. त्या लांब ठेवण्याचा सुद्धा मला राग येतो

एखादा पत्ता शोधत शोधत भलत्याच पत्त्यावर जाऊन पोचावं आणि तोच पत्ता आपल्या शोधात असल्यासारखा आपलं घर होऊन जावा; तसं होतं काही व्यक्तींच्या बाबतीत

काय असत नं, काही माणसं कुणीतरी ठरवून दिल्यासारखी येतात आपल्या आयुष्यात योग्य वेळी. पण माणसांचं आपल्या आयुष्यात येणं जसं 'आपण' ठरवू शकत नाही, तसंच जाणं सुद्धा नं रे ! जाणाऱ्याला थांबवण्याचं तंत्र आणि तो निघून गेल्यावर, त्यानंतर कसं जगावं याचा धडा कुठल्या पाठ्यपुस्तकात मिळेल ते सांग
पावसाळा आहे, बुचाच्या फुलांचे परत यायचे दिवस आले रे

म्हणूनच , परत येण्यासाठी जा, जाण्यासाठी येऊ नकोस कधीच... 

(नेहेमीप्रमाणे तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: