Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ६



रे

 काल तू फणकारुन निघून गेलास , मी फक्त म्हणाले, "तुझ्याबद्दल आपलेपणा वाटतो, पण तू अजून कळला नाहीस पूर्ण." तुला वाटलं, मी टाळतेय तुला किंवा जुलमाचा राम राम म्हणून आपण बोलतोय आणि भेटतोय. आता हा तुझा गैरसमज कसा कधी दूर करू ??

 कसं असतं नं रेएखादं माणूस आपल्याला आवडणं आणि ते पूर्णपणे कळणं यात फरक असतो , हो नं ? ढीगभर माणसं आवडू शकतात , पण जी मनाच्या जवळची असतात आणि ती आपल्याकडून किंचितही दुखवली जाऊ नयेत, असं वाटतं नं, तीच माणसं आपल्याला पूर्णपणे कळावीत, हे मनाचं मागणं असतं. एखादं माणूस जाम आवडतं पण नुसतं आवडून थांबत नाही मन. त्याला  साधी उचकी जरी लागली  तरी कळावी आपल्याला आणि धावत जाऊन आपण त्याच्या पाठीवर हात फिरवून शांत करावं त्याला, असं वाटतंच रे. त्याच्या प्रत्येक पैलूंचा नकळत अभ्यास करायला लागतो आपण.

तू समुद्र नीट पाहिलायस कधी ? किनारा, शंख शिंपले, वाळू, लाटांचा फेस.....सगळं सगळं सुखावणार तरीही परत परत समुद्रात जायची तृष्णा राहतेच. का माहितीये, कारण समुद्राचा तळ दिसत नाही आपल्याला आणि तो दिसणार नाही माहितीय तरीही पुन्हा पुन्हा ओढ लागून राहते

तसंच आहे तुझ्या बाबतीत, तुझ्या मनाचा किनारा सुद्धा अवचित गाठू देतोस तू. कशात स्वतःला इतकं बंदिस्त करून घेतलंयस देव जाणे. मग तुझ्या मनाचा तळ गाठायला मला तुला वेळ द्यायचाय. म्हणजे मला तुला अजून नीट समजून घेता येईल. कळतंय का काही ???

बाकी , चिडलास की अजून छान दिसतं तुझं ध्यान ! आणि रागारागात ती बुचाची फुलं घेताच गेलास , हे मला अजिबात आवडलेलं नाहीये

असो. तुझा राग गेला का ते कसं कळायचं हे शोधून काढावं लागणार आता मला.

-(तुझ्या मनाच्या किनाऱ्यावर उभी असलेली) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: