Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८७- हृषीकेश / ऋषिकेश


हृषीकेश / ऋषिकेश

हृषीकेश = हृषीक + ईश = क आणि ई चा संधी होऊन के होते.
हृषीक म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि ईश म्हणजे ईश्वर. हे विष्णूचे किंवा कृष्णाचे नाव आहे.


ऋषिकेश = ऋषिक + ईश अशी व्याकरण दृष्ट्या फोड होईल. परंतु ऋषिक चा अर्थ हीन दर्जाचा ऋषी (अनौरस संततीतून निर्माण झालेला ऋषी) असा आहे, त्यामुळे ऋषिकेश हा शब्द एखाद्याचे नाव म्हणून वाईट अर्थाचा ठरतो.

-नेहा लिमये

(संदर्भ: मराठी लेखन कोश - अरुण फडके आणि शब्दचर्चा - मनोहर कुलकर्णी)


वाचक हृषीकेश दाभोळकर यांनी या माहितीत घातलेली भर आणि मांडलेली दुसरी बाजू -

यावर खूप पूर्वी एक रंजक चर्चा आंतरजालावर झाली होती. मी त्यातला तज्ज्ञ नाही. माझा एका मित्र धनंजय याने त्यावर एक छान प्रतिसाद दिला होता तो जसाच्या तसा इथे देतोय. तो या विषयाला वेगळा आयाम देणारा ठरावा:-----
याबद्दल मराठीमधील नियम असाच असावा असे वाटते.

पण संस्कृतात तरी या प्रकारची चर्चा व्याकरणकारांनी केलेली आहे. पस्पशाह्निकात पतञ्जली कथा सांगतात, की ज्यांचे नाव नियमाप्रमाणे "यद्वान" आणि "तद्वान" असावे, त्या माननीय ऋषींची नावे "यर्वाण" आणि "तर्वाण" आहेत - ते योग्य आहे. तर व्यक्तींची नावे कशी असावीत ते व्युत्पत्तीवरून ठरत नसल्याचे पतञ्जलींचे मत दिसते. तसेच दुसर्‍या आह्निकात लृफिड आणि लृफिड्ड अशी काहीसुद्धा व्युत्पत्ती नसलेली व्यक्ति-विशेष-नावे कोणी वाटल्यास ठेवू शकतो, याबद्दल पतञ्जलींनी चर्चा केली आहे.

पाणिनींनी "संज्ञायाम्" असे विशेष सांगून कित्येक शब्द दिले आहेत - ते फक्त विशेषनाम म्हणून वापरात वेगळे दिसतात, आणि त्यातील घटकांचा अर्थ त्या संज्ञेच्या व्यक्तीला लागू होत नाही. त्या अर्थाने व्युत्पन्न शब्दांची रूपे मात्र नेहमीच्या नियमाप्रमाणेच होतात.

विशेषनाम असले, तर नाम धारण करणारा व्यक्ती जसा सांगेल तसा उच्चार आणि तसे लेखन इष्ट. नाहीतर आमच्या शेजारच्या हळदणकर काकांना "तुमचे मूळ गाव 'हळदोणे' आहे, म्हणून आम्ही तुम्हाला 'हळदोणकर' म्हणू!" अशी गडबड व्हायची. कोणी 'साठ्ये', कोणी 'साठे', कोणी 'साठये' आडनाव लावत असेल, त्यांना "तुम्ही चूक-नाव बदला" म्हणायचा अधिकार कोणाला आहे?

आता उदाहरणादाखल "ऋषिकेश" नाव घेतले - ऋषिकेश या व्यक्तिविशेष नावाला अर्थ असावा किंवा हे नाव ऐकून कुठला स्फूर्तिकारक बोध व्हावा, याबद्दल त्या व्यक्तीचे मत सर्वात महत्त्वाचे. ऋषिकेश नावाचे अनेक लोक असतील, तर ऋषिकेश क्रमांक ४ चे मत ऋषिकेश क्रमांक ५ यालाही लागू नाही.

आता "ऋषिकेश" या ऐतिहासिक नावाबद्दल आणि संस्कृतातील त्याच्या वेगवेगळ्या व्युत्पत्तींबद्दल. हे माझ्या मते अवांतर असले, तरी हे अवांतर का आहे? हे सिद्ध करण्यासाठी तपशील देत आहे.

वर काही वेगवेगळ्या व्युत्पत्ती दिल्याच आहेत. गंगेच्या काठावरती एक मोठे गाव आहे, त्याचे नाव "ऋषिकेश" असे आहे - सांगितलेला हा तपशील योग्यच आहे. या गावातील कित्येक संस्कृत पंडितही त्याचे नाव "ऋषिकेश" असेच लिहितात. तसेच एका सदस्यांनी दिलेली ऋषीचा केश = ऋषिकेश ही व्युत्पत्ती सोपी आणि मनात प्रथम येणारी आहे.

ऋषिक शब्दाचा अर्थ "हीन" असा दिलेला आहे. ऋषिक या शब्दाची ऋषि+ (निंदार्थक) क (अर्थ - हीन ऋषी) अशी फोड करता येते. (पण ऋषिक म्हणजे केवळ हीन - ऋषी नाही - अशी फोड मला माहीत नाही.) मोनिएर विल्यम्स यांच्या शब्दकोशातही हा "हीन ऋषी" अर्थ सापडतो. परंतु त्याच शब्दकोशात "ऋषिका" हे एका नदीचे नाव होते, असेही सापडते.
ऋषिका+ईश = ऋषिकेश -> ऋषिका नदीचा अधिपती असाही अर्थ निघतो.

ऋषिक नावाचे एक लोकविशेष होते, असे आपल्याला दिसते. दिग्विजय करताना अर्जुनाने या लोकांवर विजय मिळवला (तसा खूप-खूप देशांवर विजय मिळवला - ते सर्व वाईट लोक नव्हते). हे लोक शूर असावेत. बाकी राज्यांबद्दल सभापर्वातील २४व्या सर्गात फक्त नामोनिर्देश केला आहे. ऋषिक लोकांबाबत मात्र दोन श्लोक आहेत :
२.२४.२४ :
लोहान्परमकाम्बोजानृषिकानुत्तरानपि ।
सहितांस्तान्महाराज व्यजयत्पाकशासनिः ॥
२.२४.२५
ऋषिकेषु तु संग्रामो बभूवातिभयंकरः ।
तारकामयसंकाशः परमर्षिकपार्थयोः ॥
२.२४.२६
स विजित्य ततो राजन्नृषिकान्रणमूर्धनि ।
शुकोदरसमप्रख्यान्हयानष्टौ समानयत् ॥
अर्जुनाला युद्ध देण्याच्या लायकीचा ऋषिकांचा हा तेजस्वी राजा सुद्धा ऋषिकेशच म्हणावा.
हे युद्ध झाल्यानंतर ऋषिक लोक नाहिसे झाले नाहीत. व्याकरणमहाभाष्यात ऋषिक लोकांचे जनपद "आर्षिक" आहे, असे उदाहरण दिले आहे. (पा.सू ४.२.१०४वरील भाष्य) महाभारतानंतरही टिकलेल्या या ऋषिकांचे सर्व नेते "ऋषिकेश" म्हटले जाऊ शकतात.

- - -

सारांश : विशेषनामांसाठी मला वाटते त्या-त्या व्यक्तीलाच विचारून अर्थ, लेखनाची पद्धत आणि उच्चाराची पद्धत स्वीकारावी. कुठल्याशा एका व्युत्पत्तिजन्य अर्थाचा आरोप करून विशेषनाम चुकले आहे, असे म्हणणे कित्येकदा पटण्यासारखे नसते.

No comments: