Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # २८


रे 

तू शांततेचा आवाज ऐकला  आहेस कधी? मी ऐकते आहे सध्या ...खूप खोल पण बेसूर आवाज आहे हा. कानाचे पडदे फाटतील इतका. पण काही आवाज ऐकावे लागतातच; इच्छा असो नसो. एखाद्या वादळानंतरचे हे आवाज स्वतःला आरशात निरखून बघायला भाग पाडतात

काही वेळा काही गोष्टी आपणच आपल्यासाठी कठीण करून ठेवतो असं मला वाटतं. म्हणजे एखादी व्यक्ती काही सांगत असते, बोलत असते त्याहून आपण खूप काही वाचायला, त्यातून अर्थ काढायला  बघतो. मग त्या वाचण्याची, अर्थांची समीकरणे बनवतो. ती समीकरणे समोरच्याने accept केली नाही तरी चालतात पण आपण ती आधीच खरी मानलेली असतात. समीकरण सोडवायचा समोरची व्यक्ती प्रयत्न करत राहिली तरी आपल्याला ते नको असते. उत्तर आपण काढून झालेले असते. तितकीशी संधी देणे सुद्धा आपल्याला अयोग्य वाटते. आता समीकरण आहे, उत्तर आहे आणि तरीही आपल्याला त्या समीकरणापासून उत्तरापर्यंतची वाट दुर्बोध वाटायला लागते

समीकरणांची फोड करण्याऐवजी आपण स्वतःची तोडमोड चालू करतो आणि मग सगळेच नाकारतो एका क्षणाला. ती व्यक्ती, तिचे आपल्या आयुष्यातले स्थान, तिचे सांगणे, तडफडणे, आपल्याबद्दलची कळकळ .... सगळे सगळे तद्दन उपहासांत बदलते आपल्यासाठी

हे चूक कि बरोबर हा प्रश्न नाही इथे, पण एरवी व्यक्तीच्या 'फेस व्हॅल्यू' ला महत्व देणारे आपण इथे त्या व्यक्तीच्या सांगण्याला किंचितही व्हॅलू देत नाही, आणि नेमके हेच आपण सोयीस्करपणे विसरतो

भांडण नको म्हणून आपण शांत राहतो. खरेच शांतता मिळते त्याने? की नाते लटूकून राहते पतंगाच्या दोरीप्रमाणे ? आणि मग हा अडकलेला पतंग कसा सोडवायचा असतो?? दोरीला ढील देऊन की पतंग दोरीपासून वेगळा करून ??? काहीही झाले तरी पतंग फाटतोच आणि मन खिन्न , उदास होते. आपल्याला नाते हवे आहे, त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व हवे आहे पण ते त्या व्यक्तीला कसे जाणवून, पटवून द्यावे कळत नाही

मी ही आत्ता अशाच एका वळणावर उभी आहे... एवढंच !

(शांतता जीवघेणी असते हे जाणवलेली ) मी  

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: