Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८६- सुंदोपसुंदी


सुंदोपसुंदी

एखाद्या राजकीय पक्षामध्ये अंतर्गत मतभेद होऊन दोन गटांचा एकमेकांविरुद्धचा संघर्षात्मक प्रचार सुरू होतो; भांडणे सुरू होतात; एकमेकांवर दोषारोप सुरू होतात तेव्हा तेथे सुंदोपसुंदी सुरू झाली असे म्हटले जाते.


सुंद आणि उपसुंद हे दोन बंधू पुराण वाङ्मयातील दोन राक्षस आहेत. त्या दोघांना ठार मारण्यासाठी देवांनी तिलोत्तमा नावाच्या सुंदरीला पाठविले. त्या सुंदरीसाठी या दोनही बंधूनी परस्परांशी युद्ध केले व त्यात ते दोघेही एकमेकांच्या प्रहारांनी घायाळ होऊन मृत्युमुखी पडले. या पौराणिक कथेवरून सुंदोपसुंदी हा शब्द भाषेमध्ये आलेला आहे.

अर्थात अलीकडची तिलोत्तमा म्हणजे सत्ता अथवा संपत्ती असते आणि तिच्यासाठी भांडणारे व त्या भांडणातून दोघांचाही नाशच ओढवून घेणारे हे भांडणापूर्वीचे बंधुसदृश मित्र वा सहकारीच असतात.

- नेहा लिमये

(संदर्भ: शब्दचर्चा- मनोहर कुलकर्णी)



No comments: