Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # १३


रे 

एखाद्या जवळच्या माणसाची आपुलकीने चौकशी करावी आणि त्या व्यक्तीने "काही नाही विशेष सांगण्यासारखं" एवढंच म्हणावं..... आता यानंतर खरं  तर विचारणाऱ्याने (म्हणजे मीच तीगप्प बसायला हवं नाही का. पण नाही... शेवटी मी "मी" आहे नं.... 

मग माझ्या विचारांची साखळी सुरु होते बघ .... 

म्हणजे खरंच विशेष काही घडलेलं नाहीये जे आवर्जून सांगावंसं  वाटतंय त्या व्यक्तीला ....  किंवा खूपच काही घडलंय पण ते सांगण्याची "ही" वेळ नव्हे असं असेल का ?

 की जे काय घडलय ते सांगायला "मी" योग्य व्यक्ती नाही ?? 

का सांगायचंय पण भेटून , सांगण्याचं आत्ता हाताशी असलेलं "माध्यम" योग्य नाही ???

का सांगायचंच नाहीये कारण जे आहे ते तिच्याच मनाला माहित नाही मग काय सांगणार ???  

अशा अगणित वेळा आणि अगणित साखळ्या....माझ्याच प्रश्नाने निर्माण केलेला गुंता.. त्यात मीच अडकत जाते. विचारल्याशिवाय राहवत नाही कारण ती व्यक्ती मनाच्या जवळ असते खूप आणि विचारलं तर ही दशा होते.  काय करावं कळत नाही .... मी उजळणी करत बसतेआत्तापर्यंत त्या व्यक्तीबरोबर घालवलेल्या क्षणांची... किती बोललो, कधी बोललो, काय बोललो, कशावरून वाद झाले , काय आवडलं .... वगैरे वगैरे. सगळ्या प्रश्नांची यथासांग चिरफाड झाल्यावर एक विचारही चमकून जातो मनात ... "म्हणजे... आपली अडचण व्हायला लागली कि काय तिच्या आयुष्यात ?" ..... मनाला एकूणच घाईच असते नाही conclusions वर पोचायची. जरा म्हणून घालमेल नाही चालत

मग मी ठरवते.... आपण जरा बाजूला होऊन बघू .... असेल काहीतरी... सांगेल ती वेळ आल्यावर किंवा नाहीही सांगणार ..प्रत्येक नात्याचा एक स्वतःचा अवकाश असतो, तो द्यायला हवा नाहीतर गुदमरायला होत त्या नात्यात. मी मलाच बजावते, काय उगाच अट्टाहास तुला कि तू विचारलंस म्हणजे लगेच "पूर्ण वाक्यात उत्तरे द्या" थाटात तिने तुला सांगावं सगळं

पण तुला एक सांगू ... हा सगळा जो विचारांचा प्रवास होतो नं या टोकापासून त्या टोकापर्यंत त्याने आपल्याला नव्याने कळतं... कि किती महत्वाची आहे ती व्यक्ती आपल्यासाठी !! आणि शिवाय आपल्या मर्यादाही कळतात तिला समजून घेण्याच्या. त्या विस्तारायला हव्यात हे हि चांगलच उमजतं. एकूण नात्याचा प्रवास अजून एक अबोल समजूतदारपणाची पायरी चढतो !! 

पुढल्या खेपेला हे उत्तर मिळालं तर "ठीके", इतकंच  म्हणून थांबायची खूणगाठ बांधली जाते..... उत्तराची अपेक्षा नं ठेवता
संदीप खरे म्हणतो तसं "कितीक हळवे , कितीक सुंदर... किती शहाणे आपुले अंतर".... म्हणूनच मनाला "अंतर" पण म्हणत असावेत का रे ??
बाकी, ती व्यक्ती म्हणजे कोण, हे तुला कळायला तू म्हणजे काय मी आहेस

मी आज खूप दिवसांनी बुचाच्या झाडाशी जाऊन उभी राहिले...... नुसतंच. ते ही हसलं ... माझी वाट बघत असल्यासारखंच. अजून तरी आमच्यात अंतर नाही पडलंय... 

- तू (...............................) मी

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: