Search This Blog

Friday, November 23, 2018

बुचाची फुले # ६०


मनू

काही वाटा समांतर असल्या तरी नेहेमीच सोबत असतात. भलेही त्या एकमेकांत मिसळत नसतील, नव्हे त्यांना तसे मिसळावे वाटले तरी ते नियतीला मान्य नसेल कदाचित. पण तरीही त्यांचा प्रवास थांबत नाही. आपापले वेगळे अस्तित्व सांभाळत त्या एकमेकांना सोबत करत चालत राहतात. नागमोडया वळणांवर त्या स्वतःला समजूतदारपणे सोपवून मोकळ्या होतात. वाटेतल्या अडथळ्यांना वळसा घालून पुन्हा चालू लागतात

अशी अबोल, समजूतदार सोबत किती जणांच्या नशिबात असेल मनू? आणि असली तरी ती कितीशी वाट्याला येत असेल, हे ही एक कोडेच.

आपला पत्र-प्रवास काहीसा असाच नाही? मी काही सांगण्याआधी ते तुला पोचावे आणि तू काही लिहिण्याआधी मलाहे शेवटले पत्र लिहिताना सुद्धा तू इथेच आहेस हे जाणवते आहे.....हा भास नक्कीच नाही. तू सूक्ष्म रूपाने इथे असतेस हा ठाम विश्वास आहे माझा. खरे ना?

एकटेपणा कुणाला चुकलाय मनू? तुझा एकटेपणा वेगळा आणि माझा वेगळा. पण त्या एकटेपणात ही अशी सोबत असली की आयुष्य बुचाचे झाड होते आणि ही पत्रे, ते सोबत चालणे, यो प्रवास, सगळ्या आठवणी बुचाची फुले होऊन जातात

हा आठवणींचा प्रवास कधीच संपू नये असे वाटते, नव्हे, तो संपणार नाहीच....जोवर बुचाची फुले आहेत तोवर. हो ना??

(बुचाच्या फुलांमध्ये तुला पाहणारा तुझा) रे

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: