Search This Blog

Thursday, November 22, 2018

बुचाची फुले # ९



रे 

उकाडा असह्य होत चाललाय आताशा ... घरात बसल्या बसल्या बाहेर उन्हाकडे बघवत नाही. तगमग होते दुपारची. संध्याकाळच्या सावल्या जशा पसरत जातात, तशी जरा लाही कमी होते ; पण तरीही शांत, गार वाटत नाही आतून. मग ढग भरून यावेत आणि खूप पाऊस पडावा वाटतं..... त्या पावसात उभं राहून अंतर्बाह्य शांत होऊ द्यावं स्वतःलाघटकाभर का होईना तेवढाच उकाड्यातून विसावा.

तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते

त्या दिवशी गप्पांच्या ओघात तू पटकन बोलून गेलास , "तिनके की तरह बह जाऊंगा".... किती सहज बोललास आणि दुसऱ्या क्षणी विषय बदलून टाकलासपण माझ्या मनात रुतून बसलंय ते.  
कुठल्याही गोष्टीचा खूप विचार करायची सवय तुला. कोणी कितीही काहीही कसंही बोलो किंवा वागो, तू अति काळजीच करणार त्याची. शिवाय आणि ते दुखावलेल मन स्वतःजवळच ठेवणार

माणसांचे ढग काळेकुट्ट असतात; पण त्यातून पाऊस फार क्वचित पडतो रे, एरवी तगमग वाढवायचंच काम करतात तेत्यातूनही एखादाच ढग भेटतो कायम नुसता पाऊसच देणारा. पण त्याचा पाऊस झेलून झाल्यावर परतावच  लागतं परत माणसांच्या उन्हात

रे ..... इतकं काही साठवतोस मनात कि त्याला बाहेर पडायला वाटच राहत नाही. मग ते साठवलेलं, साचलेलं घेऊन उन्हाचा भार आयुष्यभर सोसणं आलं. तू सोसत राहतोस... स्वतःचं अस्तित्व विसरून प्रवाहाबरोबर वाहत राहतोस ........ एखाद्या गवताच्या काडीसारखा......... .... .तिनका !! 

वाटेत आलेल्या दगडा -खडकांना पार करून, भोवऱ्यात गोल गोल फिरून... कधी संथ , कधी अवखळ पाण्याचा लहेजा सांभाळत वाहणं , किती अवघड आहे रे !! मी जेवढा म्हणून विचार करते तुझ्या बोलण्याचा तेवढे डोळे भरून येतात

मला तेव्हापासून राहून राहून विचारावस वाटतंय तुला, असं वाहत वाहत समजा किनाऱ्याला लागलास आणि बुचाचं झाड दिसलं , तर थांबशील का माझी वाट पाहत ?? एक क्षणभर तरी.... तेवढेच एकमेकांचे उन्हाळे वाटून घेऊ !! 

- ( तुझ्या डोळ्यातला पाऊस झेलायला आसुसलेली ) मी 

पूर्वप्रसिद्धी :- बुकहंगामा.कॉम द्वारा संचलित " लिहिलेली पत्रे" फेसबुक पेज
लिंक :- https://www.facebook.com/NaLihileliPatre/

No comments: