Search This Blog

Tuesday, November 20, 2018

लघुकथा ७- ती



ती मोलमजुरीच काम करते...तिच्या श्वासातून दगड, विटा, वाळू, सिमेंट, खडी यांचा वास भरून राहिलाय. इलेक्ट्रिकच्या वायर, खिळे, फरश्या, पीओपी यात तिने एक आडोसा शोधलाय. त्यात तिने पत्र्याच्या घरात संसार मांडलाय. रोज पहाटे उठून ती स्टोव्ह वर आधण ठेवते आणि 'ह्यांना' तार स्वरात हाक मारते. आजूबाजूचं जग साखरझोपेत असताना ती राखेचा लेप हाताला लावून भांडी लक्ख करत असते. मग आत  बाहेर अशी लगबग करत एकदा आधण आणि एकदा लेकरू अस लक्ष ठेवते. लेकरू कडेवर घेऊनच आधण उतरवते तोवर 'हे' आन्हिके उरकून आलेले असतात. मग लेकराला जवळ बसवून मघा स्वच्छ केलेली वाटी, तापेली चमचे खेळायला देते. आणि 'ह्यांच्या' बरोबर चहा खारी खाते. लेकराला आपल्यातला थोडा चहा आणि ग्लुको बिस्कीट खायला घालते. 

मग 'हे' वरच्या मजल्यावर पाहणी करायला जातात. लेकरू एव्हाना बाकी लेकरांच्या कळपात गेलेलं असतं. मग ती छानपैकी रांगोळी काढते...सुंदर वेलबुट्टीची बॉर्डर. काहीतरी गुणगुणते. मग आवरून साडी नेसते. वेणी फणी करून पहिल्या मजल्यावर कामाला लागते.

मध्ये न्याहारीचीच काय ती वेळ, बाकी सगळा दिवस काम आणि काम...कधी साईट वर कधी स्टोव्ह पाशी. 

बदल काय तो एकच.....

तिची रांगोळी रोज वेगळी वेलबुट्टी घेऊन वावरते. 


-नेहा लिमये 
(पूर्व प्रसिद्धी : नुक्कड फेसबुक पेज - द्वारा बुकहंगामा .com )

No comments: