पासंग / पासंगाला न पुरणे
तराजू/ वजनकाटा इत्यादींच्या दोन पारड्यांमध्ये विषमता असल्यास ती घालवून सम करण्यासाठी हलक्या पारड्यात जे वजन घालतात ते म्हणजे 'पासंग'. इतक्या हलक्या वजनाला सुद्धा न पुरणे म्हणजे फारच कमी, हलके, कमी दर्जाचे असणे. पासंगाला न पुरणे म्हणजे अगदी थोडा किंवा कमी योग्यतेचा असणे.
परावर्तन /परिवर्तन
परावर्तन : ‘परावर्तनाची चळवळ’ हा शब्दबंध आपण ऐकला असेल. पूर्वी कधी ज्यांनी धर्मांतर केलेले असेल, त्यांना पुन्हा आपल्या मूळच्या धर्मात येण्याची इच्छा असल्यास तसे करण्यासाठी सोय उपलब्ध करून देणारी ही चळवळ, असे म्हटले जाते. परिवर्तन आणि परावर्तन या दोन शब्दांमध्ये अर्थदृष्ट्या पुष्कळच भेद आहे. परिवर्तन हे असलेल्या स्थितीत केलेला इष्ट तो बदल या स्वरूपाचे असते, तर परावर्तन हे मूळच्या स्थितीत पुन्हा येणे असते. परत फिरणे या अर्थाचा हा शब्द आहे.
परिवर्तन या शब्दातील ‘वर्तन’ म्हणजे असणे, वागणे, वावरणे, एखाद्या परिस्थितीत योग्य तो प्रतिसाद देणे.
परि म्हणजे परित:, सर्व बाजूंनी.
एखाद्या गोष्टीत परिवर्तन घडवायचे, तर तिला सर्व बाजूंनी फिरविले पाहिजे. एखाद्या स्थितीत तिची अवस्था अवघडल्यासारखी होत असेल, तर असे स्वत:भोवतीच फिरताना एखादी सोयीस्कर स्थिती तिला प्राप्त होऊ शकेल. असे झाले, म्हणजे त्या गोष्टीचे किंवा त्या गोष्टीत परिवर्तन झाले, असे म्हणता येईल.
भौतिकशास्त्रात पण परावर्तन हा शब्द वापरला जातो. आरशातून किरण परत फिरतात ते पण परावर्तनच.... अर्थात ते नियमाने परत फिरतात... कसेही नव्हे.
(संदर्भ:
शब्द-चर्चा-
मनोहर
कुलकर्णी)
मखलाशी
मूळ शब्द फारसी 'मखलसी' (म्हणजे मंजुरी, मान्यतेचा शेरा किंवा टीका, वादाचा निर्णय, भाष्य) किंवा अरबी 'मुखल्लस' (म्हणजे शुद्ध, बिनचूक).
सरकारातून दिली जाणारी इनामपत्रे, करारनामे, कौलपत्रे इत्यादी लिहून तयार झाली म्हणजे ती मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जातात. हे अधिकारी त्यात कमी-जास्त केल्यानंतर मंजूर केल्याची जी निदर्शक खूण स्वतःच्या हातांनी करतात त्याला 'मखलाशी' म्हणतात. यावरून सुधारणा करणे, मजकुरात कमी-जास्त करून एखाद्या गोष्टीला आपल्याला हवे तसे / इष्ट स्वरूप देणे अर्थात एखादी गोष्ट गळी उतरवण्यासाठी चापलूसी करणे अशा अर्थाने मखलाशी करणे असा अर्थ रूढ झाला.
उदा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना इतकी मोठी मदत आधी कधीच मिळत नव्हती हे सरकारने सांगितले; पण ही मदत देताना "५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची" अट ठेवून सरकारने मखलाशी केली आहे; हे मात्र कुठे बोलले जात नाही.
लेखन आणि संकलन - नेहा लिमये
No comments:
Post a Comment