त्रेधा तिरपीट
त्रि
(तीन) + धा (प्रकार किंवा मार्ग) अशी या शब्दाची फोड
आहे.
"विष्णु
स्त्रेधा विचक्रमाणः" हा वैदिक मंत्र
ह्याच्या मुळाशी आहे. वामानवतारात असताना विष्णूने बलिराजाच्या गर्वहरणासाठी तीन पावलांनी तीन लोक (स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ) व्यापून टाकले. अर्थात त्याच्या तीन पावलांचा विस्तार इतका मोठा होता; की तिन्ही लोक
व्यापले जातील, असे विष्णूचे वर्णन वेदांत सांगितले आहे.
यावरून
हे करू की ते करू
की आणखी काही करू असा गोंधळ , अनेक कामे एकाच वेळी करण्यामुळे उडणारी धांदल, तारांबळ होणे असा अर्थ.
तिरपीट
हा शब्द "त्रिपथ" या संस्कृत शब्दावरून
आला आहे. तीन रस्त्यांच्या तिकाटण्यावर / तिठ्यावर मनुष्य कुठल्या दिशेला जावे याने बावरून जातो, त्या वेळी मनाची होणारी चलबिचल म्हणजे तिरपीट.
(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश - कृ. पां. कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा.
गो. आपटे)
तावून सुलाखून निघणे
तावणे म्हणजे तापणे किंवा तापवणे. मूळ शब्द फारसी सुलाख म्हणजे चांदी-सोन्याच्या दागिन्यांतल्या धातूच्या शुद्धतेची परीक्षा पाहण्यासाठी त्याला पाडलेले भोक. सुलाखणे म्हणजे दागिन्यांतली लाख बाहेर उघडकीस येणे.
यावरून , तावून सुलाखून निघणे म्हणजे अतिशय तीव्र कसोटीस उतरणे, भयंकर दिव्यातून पार पडणे असा अर्थ.
(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश - कृ. पां. कुलकर्णी आणि मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी- वा. गो. आपटे)
यळकोट/ एळकोट/
येळकोट
एलू / येलू म्हणजे कानडी भाषेत सात + कोट. खंडोबा देवतेच्या किल्ल्याचे सात कोट (तट) आहेत, त्यावरून खंडोबाच्या आरतीची तळी उचलताना "यळकोट यळकोट उधो" असे शब्द उच्चारतात. कोट हा शब्द कोटीपासून आला असून खंडोबाच्या अमर्यादित अशा देवसैन्याला उद्देशून आहे. मल्ल दैत्याशी जो सामना झाला त्यात हे खंडोबाचे सैन्य होते व चढाई करताना त्यांनी "यळकोट यळकोट उधो" असा जयजयकार केला व निकराची लढाई केली, असे सांगण्यात येते. याचा लाक्षणिक अर्थ गोंधळ, अव्यवस्था, एकत्रित हल्ला असाही आहे.
No comments:
Post a Comment