Search This Blog

Saturday, October 27, 2018

#मराठीभाषा ५३- नखशिखांत आणि आपादमस्तक

नखशिखांत आणि आपादमस्तक
नखशिखांत - यातली नखे ही पायाची आणि शिखा म्हणजे शेंडीचे केस म्हणजेच डोक्यावरचे केस. म्हणजेच नखापासून सुरुवात करून शिखा हे शेवटचे टोक (अंत) धरून पायापासून तो डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर या नखशिखांताने व्यापले जाते.
उदा. नखशिखांत रक्ताने न्हालेल्या त्या माणसाला पाहून तिची बोबडी वळली!
किंवा
मुसळधार पावसात नखशिखांत भिजलेली ती समोर उभी राहिली आणि त्याचे भान हरपले.
आपादमस्तक - हा शब्दही खरे तर संपूर्ण शरीराचा उल्लेख करतो, पायापासून डोक्यापर्यंत असेच सूचित करतो.
उदा. महाराजांनी त्याला आपादमस्तक न्याहाळले आणि त्यांच्या कपाळावर बारीकशी आठी उमटली.
म्हणजे बघा - रक्ताने न्हाणे म्हटले, भिजणे म्हणले की, ते नखशिखांतच असते तर न्याहाळणे आपादमस्तक असते! एकेका शब्दाचे असे हे भाषेतले स्थान ठरलेले असते.

- नेहा लिमये 
(संदर्भ : शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी) 

टीप : या शब्दसंगतीला इंग्लिशमध्ये collocation म्हणतात.

No comments: