Search This Blog

Saturday, October 27, 2018

#मराठीभाषा ४५- आमंत्रण आणि निमंत्रण

आमंत्रण आणि निमंत्रण
आ व नि हे उपसर्ग मंत्रण् ह्या पदाला लागून हे उपसर्गघटित शब्द तयार झाले आहेत. आ हा उपसर्ग येणे या अर्थी व नि हा उपसर्ग प्रवेशणे, गुंतवणे, आत असणे या अर्थी वापरला जातो. सूक्ष्म अर्थच्छटा असणारे हे उपसर्गघटित शब्द आहेत.


मंत्र - सल्ला देणे, आमंत्रण/निमंत्रण - इथे आवाहन केल्याचा अर्थ. 
नि + मंत्र = विशिष्ट एका माणसाला मानपूर्वक आवाहन/ invitation.
आ- उपसर्ग = चौफेर.

आमंत्रण हे अनौपचारिक (informal) असते म्हणजे दिलेल्या वेळेच्या मागे /पुढे गेले किंवा नाही गेले तरी चालते.

निमंत्रण हे औपचारिक (formal) असते, दिलेल्या वेळेला जाणे, वेळ पाळणे अपेक्षित असते.

पण सध्याच्या काळात हे दोन्ही सारख्याच अर्थाने वापरले जातात.


बाबाराव मुसळे सरांशी चर्चा करताना अजून 2 मुद्दे समोर आले-

१. निमंत्रण हे मान्यवर व्यक्तींना तर आमंत्रण म्हणजे सार्वजनिक, सर्वांना सरसकट दिले जाते.


२. दोन ग्रामीण शब्द आहेत -

पहिला शब्द आवतन. हे वारकाहाती (म्हणजे न्हाव्याहाती) सरसकट गावमंडळींना दिलं जातं.

दुसरा शब्द निवता (नौता वरून आलेला असावा)-हे काही खास घरी दिले जाते. आणि ते कार्यक्रम असणाऱ्याच्या घरच्या बायका ज्यांना निवता द्यायचा त्या घरच्या बायकांना कुंकू लावून देत. काही ठिकाणी वारकालाच सांगितले जायचे. तो त्या घरांसमोर जाऊन 'चुलबंद निवता हाये बाई 'असं ओरडून सांगतो.

काही ठिकाणी तशा घरी करदुडा देण्याची पद्धत आहे. करदुडा मिळाला म्हणजे त्या घरच्यांनी समजून घ्यायचे.


यावरूनही आमंत्रण सरसकट आणि अनौपचारिक, तर निमंत्रण औपचारिक आणि विशिष्ट व्यक्तींसाठी असे म्हणता येईल असे वाटले.

या विषयाशी निगडीत अजून काही वाचकांच्या प्रतिक्रिया आणि माहिती -
१. खानदेशात देतात - छाप च असतो चुलीस निवत आणि दुसरी पद्धत म्हणजे अक्षदा दिल्या की सुपारी द्यायची पद्धत सुपाऱ्या मोजून किती घर पूर्ण येणार हे लक्षात येई
२. तसेच मूळ पाठवतात बहिणीला - म्हणजे यायचा खर्च असतो दिलेला आणि अक्षदा किंवा टोकन मनी म्हणूया तसंमूळ घेऊन जातो तो मुर्हाळी. यावर गावाकडे खूप लोकगीतं आहेत. हे मूळ जसे बहिणीला दिले जाते तसेच घरी लग्न असेल तेव्हा जवळच्या नातेवाईक बायकांना सुद्धा मूळ देण्याची पद्धत आजही आहे. आज तर मुळांची संख्या प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. हजार, बाराशे. ...कितीही. आपापल्या ऐपतीनुसार.

इथे मूळ देताना काही वर्षापुर्वी खोबऱ्याचे दोन कुटके गुळाने चिकटवून त्यावर करदुड्याचा दोरा गुंडाळला जाई. याला मूळ म्हटलं जाई. आता ते मागं पडलं. मूळ पत्रिका छापतात. किंवा पत्रिकेवरच मूळपत्रिका असं लिहितात.


यावरून भुलाबाईचं एक गाणं आहे "सासूबाई-सासूबाई मला मूळ आलं आता तरी धाडा ना...धाडा ना.


मूळ लावणं आणि मुऱ्हाळी जाणं असेही शब्द आहेत.नाशिक, नगर भागात वापरतात.


मूळ लावणं म्हणजे घरातील स्त्री सह सगळ्या कुटुंबाला निमंत्रण , जे फक्त अति जवळच्या नातेवाईकांसह आप्तेष्टांना असतं आणि मुऱ्हाळी म्हणजे सासुरवासीनी मुलीला सासरहून आणन्यासाठी आणि परत पाठविण्याकरता जाणारी माहेरची व्यक्ती. हे दोन्हीही शब्द मराठवाड्यातही प्रचलित आहेत.


हादग्याच्या गाण्यात हे "मूळ" येते. "सासूबाई सासूबाई मला आलं मूळ| मला काय पुसतेस बरीच दिसतेस पूस जा आपल्या सासऱ्याला||"


पोळ्याचे आदले दिवशी वर्हाडात आजोबा बैलाच्या मानेखाली तुप चोळून म्हणायचे -'आज आवतन घ्या ,उद्या जेवायला या.' दुसरे दिवशी बैलाला पुरणपोळी खाऊ घातली जायची. बैलाच्या तोंडाखालच्या सैल भागाला पोळी म्हटले जायचे.


३. गोंदिया वगैरे भागात निमंत्रणाला निमंत्रण हांडी हटका म्हणतात. हांडी म्हणजेभांडी त्या दिवशी हटकून म्हणजे उबडी अर्थात सगळ्या घराला जेवायला असतं .


४. चंद्रपूर भागात आवतन हा शब्द बोलीत प्रसिद्ध आहे. चुलीला आवतन आहे . असा निरोप असेल तर सगळं कुटुंब जेवायला बोलावलं आहे असं समजतात.


- नेहा लिमये




No comments: