Search This Blog

Saturday, October 27, 2018

#मराठीभाषा ५०- का आणि की

का आणि की
का आणि की हे शब्द वापरताना बऱ्याचदा गफलत होते. उदा. "मी थांबू की जाऊ?" याऐवजी 'मी थांबू का जाऊ?" असे विचारले जाते. किंवा "मला वाटलं की तू गेलास" याऐवजी "मला वाटलं का तू गेलास" असेही ऐकू येते.
हे टाळण्यासाठी खाली काही उदाहरणे दिली आहेत-

'का' चा वाक्यात उपयोग-
१. दर वेळी मीच का स्वयंपाक करायचा? - इथे प्रश्नवाचक
२. जर का मी स्वयंपाक करायचा असेल तर दादाने कपडे घडी घालायचे काम करावे. - इथे प्रश्नवाचक नसून, वाक्याला जोर, ठामपणा येण्यासाठी

'की' चा वाक्यात उपयोग-
१. सचिनवर विश्वास ठेवावा की नको? - इथे प्रश्नवाचक नसून "किंवा" या अर्थी.( विकल्प - हे की ते असे)
२. आई म्हणाली, की मावशींना निरोप देऊन ये - इथे दोन वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी
३. बाळ उठलं, की मला लगेच सांग - इथे 'म्हणजे', 'त्या वेळी' अशा अर्थाने
४. "आई, पाऊस पडतोय, मी गच्चीत जाऊ?"
"जा की ! त्यात काय विचारायचं?" - इथे ठासून, जोर देऊन सांगण्यासाठी

- नेहा लिमये 
(संदर्भ: लिहावे नेटके - माधुरी पुरंदरे )

No comments: