Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८२- वेदात/वेदांत/वेदान्त


वेदात/वेदांत/वेदान्त

वेदात काय सांगितले आहे? आणि वेदांत काय सांगितले आहे? या दोन वाक्यात पहिले वाक्य वेद एकच असल्याचे सुचविते. तर दुसऱ्या वाक्यात वेद अनेक आहेत, त्या सर्वांत काय सांगितले आहे, असा प्रश्न आहे. म्हणजेच येथील अनुस्वाराने अनेकवचन स्पष्ट केलेले आहे.


वेदान्त हा शब्द मात्र स्वतंत्र अर्थाचा आहे. वेदाचे अखेरचे स्वरूप, वेदाचा शेवटचा भाग हा त्याचा अर्थ आहे. वेदांत असाही हा शब्द लिहिता येईल, परंतु त्याचा उच्चार वेदान्त असा करावा लागेल.

वेदात म्हणजे एका वेदामध्ये; वेदांत म्हणजे अनेक वेदांमध्ये आणि वेदान्त म्हणजे वेदाचा शेवटचा भाग.

अनुस्वाराऐवजी परसवर्ण वापरणेही काही वेळा अर्थपूर्ण ठरते याचे एक उदाहरण.

वाचक मैत्रीण निर्मोही फडके हिने दिलेली उपयुक्त माहिती -

परसवर्ण वापरणे या विषयी महामंडळाचा नियम -
-- 'अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.'
मराठी लेखनाकरता ही एक सोय आहे.
काही उदाहरणे -- स्वरांत -- स्वरांमध्ये / स्वरान्त - स्वराने शेवट
सत्रांत - सत्रांमध्ये / सत्रान्त - सत्राचा शेवट
व्यंजनांत - व्यंजनांमध्ये / व्यंजनान्त - शेवटी व्यंजन असलेला
वृतांत - वृत्तांमध्ये / वृतान्त - इतिहास, बातमी
युगांत - युगांमध्ये / युगान्त - युगाचा शेवट

अनुस्वाराने लिहिलेल्या शब्दांना सप्तमी विभक्तीचा 'त' हा प्रत्यय लागला आहे. या प्रत्ययाने
अधिकरण, म्हणजे स्थळ, दाखवले जाते; तसेच ह्या शब्दांमधून त्या विशिष्ट नामांच्या अनेकवचनांचाही वापर दिसतो; तर पर-सवर्णाने लिहिलेल्या शब्दांना वेगळा अर्थ प्राप्त होतो.

- नेहा लिमये

No comments: