Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ८३- वाणी


वाणी

वाणी म्हणजे भाषा किंवा वाचा.


वाणीचे चार स्तर आहेत – परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.

१. परा - वाचेच्या चार अवस्थांपैकी पहिली जी नाभिस्थानी स्थित आहे. ही आठवरूप पहिली वाचा किंवा श्वासाचे पहिले स्फुरण आहे. काहीही आठवताना आपण हिच्या माध्यमातून मनाशी सवांद साधतो. परा ही अति-सूक्ष्म वाचा आहे - हे न सांगितलेले, व्यक्त न झालेले आवाक्यापलिकडचे ज्ञान असते.

२. पश्यन्ती - वाचेच्या चार अवस्थांपैकी दुसरी जी परेपासून हृदयस्थानी किंचित भासरूपात उमटते. ही वाचा सूक्ष्म आहे म्हणून जाणून घ्यायची असते.

३. मध्यमा - वाचेच्या चार अवस्थांपैकी तिसरी - कंठस्थानी राहणारी वाणी, ज्या वाणीत आपण मनात बोलतो किंवा मनाशी बोलतो. बोलण्याच्या आधीचे विचाररूप असते तो हा स्तर.

४. वैखरी- वाचेच्या चार अवस्थांपैकी चौथी जिच्या योगाने शब्दोच्चार होतात ती. स्पष्ट उमटणारी वाणी.मनुष्यप्राणी फक्त चौथ्या स्तरात बोलतो. आपण जी भाषा बोलतो ती वैखरी.हे वाचेचे सर्वात जास्त स्पष्टपणे व्यक्त होणारे रूप आहे.

प्रभाते मनी राम चिंतित जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा।। - मनाचे श्लोक , समर्थ रामदास

याचा अर्थ, सकाळी आधी रामाचे नामस्मरण, चिंतन करावे आणि मग बोलण्यात (वैखरी) आधी रामनाम यावे, त्याचा जप करावा.

-नेहा लिमये



No comments: