Search This Blog

Monday, November 5, 2018

"तिला तोलणारा तराजू"

"तिला तोलणारा तराजू"

संवाद १ -

"काय ग मीने, किती दिवस गायबेस, फोन नाही, मेसेज नाही, आहेस कुठे, बरीयेस ना , काळजी वाटली तुझी ".... मैत्रीण १

"अगं काय करू, सासरे आजारी आहेत, मुलांच्या परीक्षा, त्यात नवरा कामासाठी बाहेरगावी. मलाच सगळं बघावं लागतंय. तुझं बराय बाई, तू नोकरीच्या निमित्ताने का होईना, ८ तास घराबाहेर असतेस , घरी सासूबाई आहेत तुझ्या मुलांकडे बघायला. आमच तसं नव्हे. घराकडे आम्हालाच बघावं लागत." ...मैत्रीण २

" ------------------------" ...... मैत्रीण १ गप्प.... फोन कट आणि डोळ्यात पाणी.

संवाद २ -

"सुचित्रा, अगं भिशीला आली नाहीस ती, वाट पाहिली तुझी. तुझ्या आवडीचे दही वडे होते तर तूच गायब " ..... मैत्रीण १

"हो ना अगं, यायच खूप मनात होत गं, पण नेमकी ऑफिस मध्ये emergency मीटिंग निघाली. मारते चक्कर केव्हातरी. तुझं बराय ग, घरी असतेस, हाताखाली ३-४ नोकर आहेत, म्हणशील तेव्हा म्हणेल ते हजर, शिवाय नवरा आणि मुलं खुश. आमचा म्हणजे घरी-दारी आम्हीच नोकर. भाजी आणण्यापासून ते presentation देण्यापर्यंत आम्हीच करायच. एवढ करून इथे समाधान कोणाला आहे. जाऊ दे चल, ठेवते, इथे खंडीभर काम पडलय. नोकरी करून घर सांभाळायच म्हणजे खाऊ नाही गं !"...... मैत्रीण २ गप्प ..... फोन कट आणि डोळ्यात पाणी.

----------------------

हे दोन्ही संवाद प्रातिनिधिक आहेत. ते इथे द्यायचं कारण म्हणजे मध्यंतरी फेसबुक , व्हॅट्स अँप वर कुठे कुठे एक लेख वजा मेसेज वाचण्यात आला होता. मुलांसाठी करियर सोडून घरी बसणाऱ्या आया..... त्यांचा २४ तासाचा जॉब असतो. भाजी आणणे, घरकाम, स्वयंपाक, मुलांची दुखणी खुपणी, पै पाहुणा , सण - वार म्हणजे वर्षातून सुट्टी अशी नाहीच. शिवाय घरी राहिल्यामुळे मुलांकडे नीट लक्ष देता येतं आणि त्यासाठी करियर सोडल्याचा अभिमान वाटतो ..... असा सूर लावलेला होता. मग थोड्या दिवसांनी, दुसरा असाच एक लेख वाचनात आला, नोकरी करणाऱ्या आयांची व्यथा किंवा कथा - सतत करियर आणि संसार असं तळ्यात मळ्यात नाचणं , ऑफिस मध्ये स्पर्धेत कमी पडू नये यासाठी संघर्ष आणि घराकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून धडपड, पर्यायाने त्यातून होणारी मनाची कुतरओढ. मुलांना वेळ देता आला नाही तरी quality time देतोय, घरी बसणाऱ्या आयांच्या तुलनेत आम्ही कुठेही कमी नाही ....... असा एकूण सूर. थोडक्यात काय, तर "घरी बसलेल्या आया " आणि "नोकरी करणाऱ्या आया" यांची वर्गवारी केलेली किंवा पर्यायाने झालेली होती.

हे दोन्ही वाचत असताना, मला मूळ प्रश्न पडला कि या वर्गवारीची गरजच काय? आई कुठलीही असो, once a mother is always a mother !! अगदी मुख्यमंत्री झाली काय, एखाद्या कंपनीची प्रेसिडेंट झाली काय किंवा पूर्ण वेळ गृहिणी झाली तरी आई ही मुलांसाठी नेहेमी आईच असते. मुलं कधीच आई ला असं तराजूत तोलत बसत नाहीत. ती आई जशी आहे तसं तिला accept करतात. मुलं जर इतकी समजूतदार असतात तर मग आया का नाहीत ?? प्रत्येक आई ही प्रथम एक बाई आहे हे का विसरते ?

पूर्ण वेळ गृहिणी म्हणजे कायम गृहीत धरायच साधन आणि करियरिस्ट आई म्हणजे स्वतःचा जास्त विचार करणारी. पूर्ण वेळ आई म्हणजे मुलांकडे पूर्ण लक्ष आणि नोकरी करणारी म्हणजे मुलांचे हाल. घरी बसणे म्हणजे खूप मोकळा वेळ आणि नोकरी करणे म्हणजे सतत बिझी. या अश्या साच्यात बसवणं म्हणजे मला तो बाईपणाचा अपमान वाटतो.

तिने जो काही निर्णय घेतलेला असो, मुलांना पूर्ण वेळ देण्याचा, करियर सोडण्याचा, किंवा घरीच ट्युशन किंवा छोटा व्यवसाय करण्याचा किंवा पूर्ण वेळ नोकरी करण्याचा, तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतलेला असतो. स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवून , कुटुंबाचं हित लक्षात घेऊन मग घेतलेला असतो. तिचा संसार, मुलं ही त्या निर्णयाच्या केंद्रस्थानी असतात. मग असं असताना , का म्हणून घरी बसलो म्हणून कमीपणा मानायचा किंवा नोकरी करत असताना मनात guilt घेऊन वावरायचं.

थोडं मागच्या पिढीत डोकावून पाहुयात.....

माझी आई शाळेत शिक्षिका होती. नोकरी करून संसार संभाळताना तिने आम्हा भावंडांना कधीही हे जाणवून दिल नाही कि आई घरी नाही म्हणजे काहीतरी कमी आहे आयुष्यात.नोकरी करतोय म्हणजे काहीतरी ग्रेट करतोय असाही अभिनिवेश आणला नाही तिने आणि काही प्रसंगात तिची गरज असून कामामुळे ती आमच्यात नाही याचा बाऊही तिने करू दिला नाही. ती सतत बरोबर आहे, हे तिने लावलेल्या सवयीतून, संस्कारातून कायम आमच्या मनात आणि कृतीत उतारायचाच. त्यामुळे आम्ही कणखर झालो. माझ्या आईला जितक शाळेत शिकवणं आवडायचं तितकंच घरकाम सुद्धा.... कुठलीच गोष्ट लादली गेलीये म्हणून तिने केलीये असं मला तरी आठवत नाही. तिला घरी राहायला आवडला असतं , पण कमावणं भाग होतं म्हणून ती बाहेर पडली आणि तिने हे सगळं सहज स्वीकारून दोन्ही आघाड्यांवर बाजी मारली.

या उलट माझ्या सासूबाई शिक्षिकेची नोकरी सोडून पूर्ण वेळ गृहिणी झाल्या, पण आज सुशिक्षित बायका सुद्धा कचरतील इतक्या सफाईने त्या shares किंवा banking चे व्यवहार करू शकतात, माझ्या मुलींबरोबर ipad वर गेम्स खेळू शकतात आणि तितक्याच ताकदीने त्या घरासंबंधीचे व्यवहार सुद्धा एकटीने करू शकतात. त्यांनाही नोकरी करणं आवडल असतं, पण घरात कर्त्या बाई माणसाची कमतरता जाणून त्यांनी पूर्ण वेळ घराला वाहून घेतल, हा निर्णय सोपा नसला तरी त्यांनी तो सोपा केला आणि कुठलीही खंत ना बाळगता सर्व जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडल्या.

मला या दोघींबद्दलही प्रचंड आदर आहे आणि ममत्व सुद्धा. दोघीही तितक्याच सक्षम आहेत आणि माझा खूप मोठा आधार आहेत. माझ्यासाठी या दोघीही रोल मॉडेल्स आहेत. आणि मला वाटतं, अशी अनेक रोल मॉडेल्स आपल्या आजूबाजूला दिसतील प्रत्येकाला.

मागच्या पिढीने जर हे इतक सहज स्वीकारलंय तर आजच्या पिढीलाच ते का जड जातंय कि सोशल मीडियातून आपल्या "अमुक एक प्रकारची" आई असण्याची जाहिरात करावी लागतेय. फेसबुक वर "आपण कशी loving , caring , determined , strong mother " आहोत, हे गेम्स खेळून सिद्ध करावं लागतंय ! मुळात हे सिद्ध कोणाला करून दाखवायचंय .... एक बाई म्हणून वावरताना देवाने मुळातच आपल्याला जी संवेदनशीलता आणि तितकाच कणखरपणा दिलाय हे आपण विसरलोय का हे तपासून बघावं असं मला प्रामाणिकपणे वाटत. सतत कोणीतरी "validate " करायची सवय लावून घेतलीये आपण स्वतःला. तरच आपण आपल्या लेखी चांगले , गुणी ठरतो.

आपण महिला सक्षमीकरण आणि स्वातंत्र्य याबद्दल बोलतो. पण मुळात एक बाई म्हणून आपण आपल्या विचार करायच्या पद्धतीत बदल कधी घडवून आणणार ? मी पूर्णवेळ गृहिणी आहे किंवा नोकरी करून घर संभाळणारी आई आहे अशी लेबल चिकटवणे कधी थांबवणार. त्यापेक्षा पुढे जाऊन, मी आज स्वतः मुलांना चांगले संस्कार देऊ शकते, माझी तब्येत सांभाळून घरच्यांचही स्वास्थ्य सांभाळते, बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहार माझ्या बळावर करू शकते, नोकरी असो व घर सर्व जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकते, याचा मला अभिमान वाटतो हा विचार जेव्हा आपण स्वतःच्या मनात रुजवू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सक्षम झालोय अस म्हणायला हरकत नाही. मागच्या पिढीचा वारसा आपल्याला चालवायचा असेल तर जी आहे ती परिस्थिती स्वीकारून सहज पुढे चालत राहणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना, आपलीही छोटी छोटी ध्येय साध्य करायला न विसरणं यातच "बाई"पणाच आणि "आई" असण्याचं फलित आहे, नाही का ??

- नेहा लिमये

No comments: