Search This Blog

Monday, November 5, 2018

#मराठीभाषा ६३- बादरायण संबंध

बादरायण संबंध

अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरु:।
बादरायणसंबंधात् यूयं वयं वयम् यूयम्।।


आम्ही बोरीच्या झाडापासून चाक केलेलं आहे आणि तुमच्या इथे एक बोरीचं झाड आहे, हा जो बादरायण (बदरीमुळे - बोरीच्या झाडामुळे आलेला) संबंध आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही एकच झालो की, असा या श्लोकाचा अर्थ.

यावरून, दोन गोष्टींचा एकमेकींशी फारसा काही संबंध नाही हे स्पष्ट दिसत असतानाही ओढूनताणून असा काही संबंध दाखविण्यात येतो, तेव्हा त्याला म्हणतात बादरायण संबंध.

उदाहरणार्थ, ‘तुम्ही ज्या कॉलेजात शिकलात, त्याच कॉलेजात आमच्या गावचा एक मुलगा माळी म्हणून फार वर्षांपूर्वी काम करीत होता, त्यामुळे आता आमचं काम तुम्हाला करायलाच हवं, नाही का?’ हा आहे बादरायण संबंधाचा नमुना.

- नेहा लिमये



#मराठीभाषा ६२- निकष

निकष

नि + कष् = कष् म्हणजे घासणे, ओरखडा काढणे
'नि' हा उपसर्ग इथे 'अधिकता' दर्शवतो. म्हणजे अत्यंत घासणे/ ओरखडा काढणे या अर्थी.


सोन्याची पारख करण्याकरिता सुवर्णकाराकडे एक विशिष्ट दगड असतो. त्यावर सोने घासून, सोन्याची रेषा ओढून सोने किती नंबरी आहे ते पाहिले जात असते. त्या दगडाला म्हणतात 'निकषोपल' ( निकष-उपल - उपल म्हणजे दगड).

म्हणूनच, निकष म्हणजे पारख करण्याचे साधन किंवा प्रमाण.

उदा. अमुक एका जागेसाठी पारितोषिकासाठी वगैरे निवड करण्याचे तुमचे निकष काय आहेत हो?

-नेहा लिमये

(संदर्भ : शब्द-चर्चा- मनोहर कुलकर्णी )

#मराठीभाषा ६१- पंचम


पंचम

"पंचम स्थानेषु गाति इति पंचम:" म्हणजे सप्तसुरांपैकी पाचव्या स्थानावरील सूर म्हणजे 'प' किंवा 'पंचम' असे आपल्याला ठाऊक आहे.


परंतु केवळ पाचवा सर म्हणून तो पंचम नव्हे. तर नाभि, कंठ, हृदय, कपाळ आणि रक्ताशय या पाच स्थानांमधील वायूपासून हा स्वर निघतो म्हणून तो पंचम.

तसेच पूर्वी 'पंचम' हा शब्द थोडासा उपरोधिक विनोदाने 'तंबाखू'साठीही वापरला जात असे. कारण तंबाखू हा 'पाचवा' पदार्थ तर पान, चुना, सुपारी आणि कात हे आधीचे चार पदार्थ. त्यापासून विडा/ पान तयार होते.

एका शब्दाचे दोन फारच भिन्न अर्थ !!

- नेहा लिमये

(संदर्भ - मराठी व्युत्पत्ति कोश - कृ पां कुलकर्णी)

टीप : रक्ताशय म्हणजे शरीराचा कुठलाही अवयव ज्यात रक्त असते किंवा त्यातून रक्त निर्माण होते/वाहते - जसे हृदय/यकृत/ आतडे वगैरे.

#मराठीभाषा ६० - अजागळ / गलथान


अजागळ / गलथान

"अजा" हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ बकरी. अजापुत्र म्हणजे बकरा किंवा बोकड. या प्राण्याला गळ्याशेजारी स्तनांसारख्या दोन मांसग्रंथी असतात परंतु, त्यातून दूध निघत नाही म्हणजे त्या निरुपयोगी ठरतात. त्यावरून "अजागलस्तन" हा शब्द रूढ झाला. याचेच रूप म्हणजे अजागळ. तसेच , 'गलथान' या शब्दात 'थान' म्हणजे 'स्तन' असे सूचित होते.


अजागळ म्हणजेच टापटीप नसलेला, अव्यवस्थित (मनुष्य) तर गलथान म्हणजे दिखाव्यापुरता पण उपयोगशून्य/ बेशिस्त (मनुष्य किंवा कारभार).

"अजापुत्रं बलिं दद्यात" म्हणजेच बकरा किंवा बोकड जसा काही अपराध नसताना बळी दिला जातो तसेच निरपराधी, निर्दोष माणसाला शिक्षा भोगावयास लावणे.

- नेहा लिमये

(संदर्भ : शब्द-चर्चा - मनोहर कुलकर्णी )



#मराठीभाषा ५९- लवकर / लौकर


लवकर / लौकर

ल आणि व चा पाठोपाठ उच्चार करताना तो "लौ" असा ऐकायला येतो; याला श्रुती होणे असे म्हणतात. पण लिहिताना 'लवकर' असेच लिहावे.


याचप्रमाणे - अवघड (औघड ) , कवटाळणे (कौटाळणे), घवघवीत (घौघवीत), लवचीक (लौचीक), चवदार (चौदार), वगैरे

टीप: कंसात लिहिलेला त्या शब्दाचा उच्चार आहे.

अशा प्रकारे उच्चारण आणि लिखाण यातला भेद लक्षात घ्यावा.

- नेहा लिमये

(संदर्भ: मराठी लेखन कोश- अरुण फडके)



#मराठीभाषा ५८- अभूतपूर्व आणि न भूतो न भविष्यति


अभूतपूर्व आणि न भूतो न भविष्यति

अभूतपूर्व


अगदी अशक्य कोटीतील, आजवर न घडलेली, परंतु आश्चर्यकारकरीत्या आज मात्र अनुभवास आलेली अशी एखादी गोष्ट अभूतपूर्व या शब्दाने उल्लेखिली जाते. अशी गोष्ट यापूर्वी कधीच घडू शकलेली नाही ही वास्तविकता.

न भूतो न भविष्यति

परंतु अशी गोष्ट पूर्वी तर कधी घडली नाहीच, पण ती पुढेही कधी घडण्याची शक्यता नाही (आताच ती घडली हे विशेषच!) अशी या घटनेची भावी काळातीलही अशक्यता व्यक्त करायची असेल तेव्हा तिचे वर्णन ‘न भूतो न भविष्यति’ या शब्दबंधाने करतात.

- नेहा लिमये

#मराठीभाषा ५७- अध्वर्यु


अध्वर्यु
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिपर्वाचे अध्वर्यु अशी स्वा. सावरकरांची ओळख करून दिली जाते. इथे अध्वर्यु म्हणजे ‘प्रमुख’ असा अर्थ आपण समजून घेतो. हा शब्द यज्ञ-संस्थेतून भाषेत आलेला आहे. कोणत्याही यज्ञामध्ये चार प्रमुख ऋत्विज असतात. होता, अध्वर्यु, उद्गाता आणि ब्रह्मा. त्यांच्यापैकी यज्ञात देवतांना आहुती अर्पिण्याचे काम अध्वर्यूला करावयाचे असते.


होता हा वेदांमधील मंत्र म्हणून देवतांना आवाहन करतो. उद्गाता ते मंत्र कलात्मक पद्धतीने गातो आणि ब्रह्मा सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवतो; पण देवतांना प्रत्यक्ष आहुती अर्पण करण्याचे काम अध्वर्यु करतो. त्यामुळे तोच या यज्ञामध्ये सर्वांचे व विशेषत: देवतांचेही लक्ष वेधून घेतो. त्यालाच महत्त्व प्राप्त होते. कारण त्याचे काम सर्वात महत्त्वाचे असते.

म्हणूनच कोणत्याही कामात असे महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या व्यक्तीला अध्वर्यु असे म्हणतात.

- नेहा लिमये


#मराठीभाषा ५६ - संतत आणि सतत


संतत आणि सतत
संतत = सम्+तत याचे सन्तत, नंतर संतत व अखेर सतत असेही रूपांतर झाले आहे.


तन् धातूचा अर्थ पसरणे, पुढे जाणे असा असून तत हे त्याचे भूतकालवाचक विशेषण आहे. तत म्हणजे सरकलेला, निर्माण झालेला इत्यादि आणि त्यामागील सम् या उपसर्गाचा अर्थ आहे निर्दोषपणे, सतत, एकसारखा मधे न थांबता, अखंडपणे.

उदा. संततधार (पाऊस), संततधार (अभिषेक)

सतत = म्हणजेही एकसारखा, न थांबता

परंतु 'संतत' हे नामाचे विशेषण आहे तर 'सतत' हे क्रियाविशेषण आहे.

उदा. ‘रस्त्यावरचे वाहातूक नियंत्रक पोलिस सतत सगळ्या रहदारीवर लक्ष ठेवून असतात’. या वाक्यात संतत / संततधार हा शब्द वापरून चालणार नाही.

'सातत्य राखणे' म्हणजे एखादी गोष्ट सतत, नियमितपणे करणे.

- नेहा लिमये



#मराठीभाषा ५५- रकार आणि रफार


रकार आणि रफार

रकार - 'र' हे व्यंजन दुसऱ्या व्यंजनाला जोडायचे असल्यास ह्या दुसऱ्या व्यंजनाला / किंवा ^ अशी खूण करावी लागते. यात ते व्यंजन आणि र ह्यांचा एकत्रित उच्चार केला जातो.


उदा. प्राण, भ्रम, ग्रासणे, ट्रक, ड्रम

रफार - 'र' ह्या व्यंजनाला दुसरे कोणतेही व्यंजन जोडायचे असल्यास ह्या दुसऱ्या व्यंजनावर जी खूण करतात तो रफार. यात त्या अक्षराचा उच्चार करण्यापूर्वी 'र' चा उच्चार करायचा असतो.

उदा. पर्व, मार्ग

आणखी एक गोष्ट - जर 'र' वर आघात येत असेल तर असे जोडाक्षरी शब्द सूर्य, अर्हता , धैर्य असे रफार देऊन लिहिले जातात.

जर 'र' वर आघात येत नसेल तर सुऱ्या, कुऱ्हाड असे लिहितात.

(संदर्भ : मराठी लेखन-कोश- अरुण फडके)

- नेहा लिमये



#मराठीभाषा ५४ - षष्ट्यब्दी


षष्ट्यब्दी

'षष्टि' ( म्हणजे साठ) + ' अब्द ' (म्हणजे वर्ष) = षष्ट्यब्द = साठ वर्षे पूर्ण होणे. आणि तो साजरा करणे याला 'षष्ट्यब्दी' किंवा षष्ट्यब्दपूर्ती समारंभ' असे म्हणतात.


शताब्दी सारखेच षष्ट्यब्दी असे या शब्दाचे रूप होते. षष्ठ्यब्दी, षष्ठ्याब्दी असे चुकीचे शब्द वापरले जातात.

कारण-

षष्टि = साठ,
षष्ठ = सहावा आणि
षष्ठी = सहावी.

म्हणून 'ट' आणि 'ठ' चा फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

- नेहा लिमये